रसिकांमध्ये असंतोष
पनवेल तालुक्यातील वासुदेव बळवंत फडके नाटय़गृहाच्या आवारात पालिकेने अतिक्रमणविरोधी कारवाईत जप्त केलेले भंगार सामान ठेवण्यास सुरुवात केल्याने नाटय़रसिकांमध्ये नाराजी आहे.
केवळ पनवेल तालुकाच नव्हे तर शेजारील उरण, पेण भागातील नाटय़रसिकही येथील नाटय़गृहात येत असतात. त्यामुळे रसिकांची वाहने पार्क करण्यासाठी बऱ्याचदा जागा अपुरी पडते. त्यामुळे त्यांना नाटय़गृहाच्या बाहेर वाहने पार्क करावी लागतात. अशा परिस्थितीत नाटय़गृहाच्या आवारात अतिक्रमण कारवाईतील जप्त सामान ठेवले जाऊ लागल्याने रसिकांमध्ये असंतोष आहे. पर्यायी जागा उपलब्ध नसल्याने नाटय़गृहाच्या आवारात साहित्य ठेवण्यात आल्याचे स्पष्टीकरण महापालिका प्रशासनाने दिले आहेत.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात सध्या जोरदार अतिक्रमण कारवाई सुरू असून त्यातून जप्त केलेले साहित्य महानगरपालिका कार्यालयाजवळ आणून ठेवण्यास सुरुवात केली आहे. ती जागा कमी पडू लागल्याने वासुदेव बळवंत फडके नाटय़गृहाच्या आवारात पाण्याच्या रिकाम्या टाक्या, फेरीवाले वापरत असलेल्या ढकलगाडय़ा आदी भंगार सामान आणून ठेवले जात आहे.
एकीकडे नाटय़गृहातही नाटय़प्रयोगांपेक्षा इतर सभा-संमेलनेच मोठय़ा प्रमाणात होत असताना बाहेरही असा वेगळाच तमाशा सुरू असल्याने रसिकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे नाटय़गृह परिसरातील स्वच्छता आणि सौंदर्याला मोठी बाधा निर्माण झाली आहे.
नाटय़गृहाची वास्तू शहरातील सांस्कृतिक केंद्र आहे. त्याचे पावित्र्य आणि सौंदर्य जपणे आवश्यक आहे. या ठिकाणी भंगार साहित्य ठेवणे अतिशय चुकीचे आहे. त्यामुळे नाटय़रसिकांना पार्किंग मिळण्यात अडचणी होत आहेत. एक नाटय़प्रेमी म्हणून मी याचा निषेध करतो. – चंद्रशेखर सोमण, कलावंत
सध्या अतिक्रमण कारवाईत जप्त केलेले साहित्य ठेवण्यास जागा उपलब्ध नसल्याने नाटय़गृहाच्या आवारात ठेवले आहे. लवकरच त्या साहित्याचा लिलाव करून संबंधित जागा मोकळी करण्यात येईल. – जमीर लेंगरेकर, उपायुक्त