नवी मुंबई : वटपौर्णिमेला महिला वडाच्या झाडाला फेऱ्या मारून पूजा करतात तर काही महिला वडाची फांदी आणून पूजा करतात. मात्र याने पर्यावरणाची हानी होते. त्यामुळे पर्यावरणाचे संवर्धन व्हावे व विधीही व्हाव्या या संकल्पनेतून नेरूळमधील आर्यवर्त फाउंडेशन तर्फे वडाची झाडे लावून वटपौर्णिमा साजरी करण्यात आली.
वटपौर्णिमा हा सौभाग्यवर्धन आणि आयुष्यवर्धन असणारा सण आहे. त्यामुळे अधिक जीवन असणाऱ्या वडाच्या झाडाला दोरा बांधून आपल्या सौभाग्यासाठी महिला पूजा करतात. वड आणि पिंपळाची झाडे ही नैसर्गिक ऑक्सिजनचा खूप मोठा स्रोत आहेत. म्हणून या वटपौर्णिमा सणानिमित्त आर्यवर्तन फाउंडेशन तर्फे वडाचे, पिंपळाचे आणि नारळाचे झाड लावून त्यांचे पूजन करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन नेरूळमध्ये केले होते. या कार्यक्रमात पुरुष मंडळींनी वड-पिंपळाची झाडे लावली, तर महिलांनी त्या वृक्षसंवर्धनाची जबाबदारी घेऊन पूजा केली. अशा पद्धतीने स्त्री पुरुष सर्वांनी मिळून एक आगळीवेगळी वटपौर्णिमा साजरी केली आणि एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा – नवी मुंबई : झाडांची अतिरिक्त छाटणी, महापालिकेचे दुर्लक्ष
सर्वांनी या अनोख्या वटपौर्णिमेचे स्वागत केले आणि दरवर्षी वटपौर्णिमेला एक तरी वडाचे झाड लावू असा संकल्प केला. यावेळी भाजपा महिला मोर्चाच्या मंगल घरत, राज कोठारी, प्रवीण गावडे, विनायक गिरी, संतोष ढेंबरे, अंजनी सैनी, सुषमा निघोट, पूजा गावडे, स्मिता जाधव, विमल पेरवी, राणी ढेंबरे, लीलावती ढेंबरे आदी उपस्थित होते.