अर्भकालय, बालिकाश्रम, वृद्धाश्रम, महिला सबलीकरण अशा विविध मार्गानी वंचितांना पाठबळ देणारी संस्था म्हणजे ‘वात्सल्य ट्रस्ट’, मुंबई. धर्मादाय आयुक्तांच्या मान्यतेने फेब्रुवारी १९८३ मध्ये कांजूरमार्ग येथे संस्थेची स्थापना झाली. सध्या कांजूरमार्ग पूर्व, सानपाडा आणि अलिबाग येथे अखंडपणे सामाजिक कार्य सुरू आहे. गजानन दामले यांनी या संस्थेची स्थापना केली आणि आज ८८व्या वर्षीदेखील अनाथ व वंचित मुलांसाठी कार्यरत आहेत. सुरुवातीला फक्त दोन लहान मुली दत्तक घेऊन त्यांनी सुरू केलेली ही संस्था आज वंचितांचा व दुर्बलांचा आधारवड बनली आहे.
वात्सल्य ट्रस्ट, सानपाडा सेवा प्रकल्प
भुसावळ रेल्वे यार्ड, कोकण व महाराष्ट्राच्या विविध भागांतील अनाथ मुलांना आणून पोलिसांच्या परवानगीने संस्थेत आणण्याचे काम दामले व त्यांचे सुरुवातीचे चार-पाच सहकारी करत होते. सानपाडा येथील कार्याची सुरुवात ८ फेब्रुवारी २०००ला बालिकाश्रम प्रकल्पाने झाली. सुरुवातीला येथे ७ ते १८ वर्षे वयोगटातील मुलींच्या राहण्याची सोय करण्यात आली होती. राज्य सरकराच्या बालकल्याण समितीच्या परवानगीने मुलांना येथे प्रवेश दिला जातो. उपेक्षितांचे पुनर्वसन करणे, त्यांच्यात जगण्याची नवी उमेद निर्माण करणे, हे या संस्थेचे उद्दिष्ट आहे.
नवी मुंबई शहर वसवताना देशाच्या विविध प्रांतांतील कामगार येथे स्थायिक झाले. त्यांच्यातील वादांमुळे वाऱ्यावर सोडण्यात आलेल्या, अनैतिक संबंधातून जन्म झालेल्या आणि अनाथ मुलींना पोलिसांच्या मदतीने संस्थेत आणले जात असे. त्यांना निवारा देणे, पालनपोषण करणे आणि शिक्षण देऊन स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी सक्षम करणे ही जबाबदारी संस्थेने स्वीकारली. जवळच असलेल्या विवेकानंद शाळेमध्ये त्यांना प्रवेश मिळवून दिला जात असे. कुटुंबात राहताना ज्या गोष्टी बालकांना मिळतात, त्या सर्व सोयीसुविधा आणि प्रेम येथे मिळते. शैक्षणिक खर्चासह ज्यादा तासिकाही घेतल्या जातात. विविध संस्थांसाठी स्वयंप्रेरणेने कार्य करणाऱ्या महिला त्यांना अभ्यासात मार्गदर्शन करतात. याच संस्थेद्वारे अनेक मुलींना उत्तम शिक्षण घेऊन स्वत:च्या पायांवर खंबीरपणे उभे राहण्याचे बळ दिले.
१०वीत नापास झालेल्या मुलींना नर्सिगच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवून देण्यात येतो. त्यांना नोकरी मिळवून देण्याचे प्रयत्नही संस्था करते. प्रत्यक्षिक ज्ञान मिळावे यासाठी डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाचे त्यांना सहकार्य लाभते. २००८ मध्ये संस्थेने यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यपीठाचा अभ्यासक्रम सुरू केला. आतापर्यंत सहा बॅचेस हा अभ्यासक्रम पूर्ण करून बाहेर पडल्या आहेत. शिवणकला, फॅशन डिझायनिंग, ब्युटिशियन असे विविध काौशल्यप्रशिक्षणही संस्थेद्वारे दिले जाते. शिक्षणाला तंत्रज्ञानाची जोड हवी म्हणून, संस्थेद्वारे ३ जानेवारी २०१२ पासून संगणक प्रशिक्षण सुरू करण्यात आले. त्यासाठी इनरव्हील डिस्ट्रिक्ट या संस्थेने साहाय्य केले. फक्त मुलींनाच नव्हे तर विभागातील सर्वानाचा संगणकाचे अल्पदरात प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे या संस्थेत संगणक शिकण्यासाठी येणाऱ्यांचा ओघ अधिक आहे. ८०० रुपये एवढय़ा नाममात्र दरात संगणकाचे प्रशिक्षण दिले जाते.
विभक्त कुटुंबपद्धत, परदेशात शिक्षण-नोकरी, जुन्या-नव्या पिढीच्या विचारांतील दरी यामुळे ज्येष्ठांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे संस्थेतर्फे वृद्धाश्रम चालवला जात आहे. एका खोलीत दोघे जण या पद्धतीने राहण्याची सोय करण्यात आली आहे. संस्थेच्या आवारातच मंदिर आहे. बालिकाश्रमात असलेल्या मुलींवर येथील ज्येष्ठांचे आजी-आजोबांसारखे प्रेम आहे.
अनेक दानशूर व्यक्ती संस्थेला मदत करतात. स्मृतिभोजन योजना मुलांचे वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस असे विविध दिन या ठिकाणी साजरे केले जातात. बालिकांच्या मिष्टान्न जेवणासाठी ३५०० रुपये तर मुलाचा वाढदिवस संस्थेतील मुलींबरोबर साजरा करण्यासाठी १५०० रुपये देऊन अनेक जण त्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. ५ हजार रुपये देणगी देऊन संस्थेत असलेल्या एका मुलीच्या शिक्षणासाठी मदत करता येते. तसेच नवी मुंबईतील रुग्णांसाठी रुग्णोपयोगी साहित्य सेवा पुरवण्याचे काम संस्थेद्वारे अल्पदरात केले जाते. त्याचा अनेक गरजूंना फायदा झाला आहे.
उन्हाळी शिबिरात पणत्या बनविणे, रंगविणे, चित्रकला, दागिने बनवणे इत्यादींचे प्रशिक्षण दिले जाते. संस्थेतील मुलींना संस्थेच्या आवाराबाहेरच्या समाजाची ओळख व्हावी, जगरहाटीचे ज्ञान मिळावे, यासाठी समुपदेशकही नेमले आहेत. सुमारे ९०० मुलांना सायबर सिक्युरिटीचे प्रशिक्षणही दिले आहे. एमएससीईटीसह विविध ३० अभ्यासक्रम करता येतात. मुलींचा सर्वागीण विकास व्हावा, म्हणून शक्य ते सर्व येथे केले जाते.
निस्वार्थ सेवा
गजानन दामले यांनी समाजसेवेचे व्रत घेतले आहे. त्यांना तशाच खंबीर सहकाऱ्यांची साथ लाभली आहे. डॉ. आठवले, तसेच सानपाडा येथील प्रकल्पप्रमुख ल. भ. नलावडे, उषाताई बर्वे, अजित कुलकर्णी यांच्यासह लाखो हात नि:स्वार्थीपणे कोणताही मोबदला न घेता अविरत सेवा करत आहेत.
१५०० मुली दत्तक
कांजूरमार्ग येथे ० ते ६ तर सानपाडा या संस्थेत ६ ते १८ वर्षे वयोगटातील मुलींना बालकल्याण समितीमार्फत पाठवले जाते. १५०० मुलींना त्यांच्या पायांवर खंबीरपणे उभे करून चांगल्या कुटुंबात दत्तक दिले आहे. त्यातही सर्व नियम पाळले जातात. अनेक दानशूर हातांची संस्थेला इथवर आणल्याचे संस्थेचे संस्थापक दामले ८८व्या वर्षी अभिमानाने सांगतात. मुलींना खंबीरपणे जगण्यासाठीचे बाळकडू अखंड देण्याचा निर्धार दामले व्यक्त करतात.
संतोष जाधव santoshnjadhav7@gmail.com