नवी मुंबई, ठाणे : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भाज्यांची आवक ६० टक्क्यांनी घटल्याने त्यांचे किरकोळ बाजारातील दर भडकले आहेत. कोथिंबिरीने कहर केला असून, किरकोळ बाजारात जुडीचा भाव शंभरीपार गेला आहे. मेथीची जुडीही ५० रुपयांच्या घरात पोहोचली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुसळधार पावसामुळे भाज्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. काढणीला आलेल्या भाज्याही पावसाच्या तडाख्याने खराब झाल्या. परिणामी, त्यांची आवक ४० टक्क्यांवर आली आहे. फ्लॉवर, शिमला मिरची, फरसबी, गवार, भेंडी या भाज्यांनी किरकोळ बाजारात किलोमागे शंभरीचा टप्पा ओलांडला आहे. कोिथबिरीने तर कहर केला आहे. घाऊक बाजारात कोिथबिरीची एक जुडी ८० रुपयांवर गेल्याने किरकोळ बाजारात ती १०० रुपयांवर गेली आहे. सर्वाधिक पसंतीच्या मेथीच्या एका जुडीचा दर ५० रुपयांवर गेला आहे. काही दिवसांपूर्वी फ्लॉवर, शिमला मिरची, फरसबी, गवार, भेंडीचे दर किरकोळ बाजारात ६० ते ८० रुपये होते. सध्या किरकोळ बाजारात त्यांचे प्रति किलो दर १०० ते १२० रुपयांवर पोहोचले आहेत. ऐन पितृपक्षात भाज्या कडाडल्याने सर्वसामान्यांचे महिन्याचे अर्थगणित बिघडले आहे. पावसामुळे पालेभाज्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे बाजारातील आवक कमी झाली, असे भाजी विक्रेते भगवान तुपे यांनी सांगितले.

हिरव्या मसाल्यातून कोथिंबीर वजा

कोथिंबिरीची आवक ७० टक्क्यांनी घटली आहे. किरकोळ विक्रेत्यांनी हिरव्या मसाल्यातून कोिथबिरीला वजा केले आहे. काही दिवसांपूर्वी २५ ते ३० रुपयांना मिळणारी कोिथबिरीची लहान जुडी सध्या ५० ते ६० रुपयांना, तर ५० ते ६० रुपयांना विकली जाणारी मोठी जुडी सध्या १२० ते १५० रुपयांना विकली जात आहे.

किरकोळ बाजारातील भाज्यांचे दर (प्रति किलो)

भाज्या               आधीचे                               सध्याचे

फ्लॉवर                ७० ते ८०                           १०० ते १२०

शिमला मिरची         ६० ते ८०                                १००

फरसबी               ६० ते ८०                               १०० ते १२०

कोबी                  २० ते ३०                               ४० ते ५०

गवार                  ८० ते १००                             १२० ते १६०

भेंडी                   ६० ते ८०                                १००

लाल भोपळा             २० ते ३०                                   ४०

टोमॅटो                 २० ते ३०                                ४० ते ५०

दर दुप्पट..

राज्यभर सुरू असलेल्या पावसामुळे भाज्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. काढणीला आलेल्या भाज्या खराब झाल्या. मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील भाज्यांची आवक ६० टक्क्यांनी घटली. त्यामुळे भाववाढ होऊन भाज्यांचे दर दुप्पट झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

घाऊक बाजारात..

’नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी ६४७ भाजीपाल्याच्या गाडय़ा दाखल.

’कोथिंबिरीसह ६० टक्के खराब भाज्यांची आवक

’नाशिकची कोथिंबीर जुडी ४० ते ५० रुपयांवरून ५० ते ८० रुपयांवर

’मेथीची जुडी १८ ते २४ रुपयांवरून ३० ते ४० रुपयांवर

आगामी १५ दिवस दर चढेच : पावसात भिजलेल्या, खराब भाज्या बाजारात दाखल होत आहेत. आवक होणाऱ्या भाज्यांपैकी साधारण ६० टक्के भाज्या खराब आहेत. त्यामुळे भाववाढ झाली आहे. पुढील १५ दिवस भाज्यांचे दर चढेच राहतील, असे ‘एपीएमसी’तील घाऊक व्यापारी भाऊसाहेब भोर यांनी सांगितले.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vegetables prices in the retail market went up as rain hit supply zws