आवक १०० ते १२५ गाडय़ांनी कमी; महिनाभरापूर्वीपेक्षा दरांत ४० टक्क्यांची वाढ

नवी मुंबई मुंबईला भाजी पुरवठा करणाऱ्या उत्तर व पश्चिम महाराष्ट्रात अचानक कडाक्याची थंडी पडू लागल्याने वेलीवरच्या भाज्यांचे दर चक्क ४० टक्याने वाढले आहेत. यात समाधानाची बाब एकच की भाज्यांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाटाण्याची आवक मध्य प्रदेशमधून वाढली असल्याने या दरवाढीची झळ जास्त जाणवत नाही. वाटाणा सर्व भाज्यांना पर्यायी भाजी म्हणून वापरला जातो. त्याचा दर वीस ते पंचवीस रुपये प्रति किलो आहे. मात्र दोन महिन्यापूर्वी दराची शंभरी पार केली होती.

वातावरणातील बदलावर भाज्यांच्या दरवाढीचे गणित अवलंबून असते. नवी मुंबईतील भाज्यांच्या घाऊक बाजारात येणारी आवक मागील दोन दिवसांपासून कमी होऊ लागली आहे. सर्वसाधारपणे साडेपाचशे ते सहाशे ट्रक टेम्पो भरून आलेली भाजी मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकसंख्येला पुरेशी आहे, पण यात कमी अधिक प्रमाण झाले की भाज्यांचे दर कमी जास्त होत असल्याचा अनुभव आहे.

तुर्भे येथील घाऊक बाजारात दररोज येणाऱ्या भाज्यांची आवक मागील दोन तीन दिवसांपासून १०० ते १२५ गाडय़ांनी कमी होऊ लागली आहे. मुंबईला उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही तालुक्यांमधून भाजी पुरवठा केला जातो. महिन्यापूर्वी झालेले मुबलक भाजी पुरवठय़ामुळे व्यापाऱ्यांना भाजी उकिरडय़ावर फेकून देण्याची वेळ आली होती. भाजी बाजारात येणारी दररोजची आवक थेट १०० ते १५० गाडय़ांनी वाढल्याने ही वेळ व्यापाऱ्यांवर आली होती. त्यामुळे भाज्यांचे दर कमालीचे गडगडले होते. त्यानंतर एक महिना हे दर स्थिरावत नाहीत तोच डिसेंबरअखेर पडू लागलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील गारठय़ाने भाज्यांची आवक कमी केली आहे. यात विशेषत: वेलीवर येणाऱ्या कारली, दुधी भोपळा, फरसबी, घेवडा, दोडका, शिराळी, वालवड, या भाज्यांचा दरवाढीमध्ये समावेश आहे.

हे सर्व दर घाऊक बाजारातील असून यात मागील महिन्यापेक्षा ४० टक्क्यांची वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात या भावात आणखी २० ते ३० टक्यांनी वाढ करून विकल्या जात आहेत.

वाटाणा २० ते २२ रुपये प्रति किलो

याच काळात मध्य प्रदेश मधील इंदूर येथील वाटाण्याने भाजी बाजारात सध्या चांगला जम बसविला असल्याने दोन महिन्यापूर्वी १०० ते १२० रुपये किलोने असलेला वाटाणा २० ते २२ रुपये प्रति किलोने विकत मिळत आहे. प्लॉवर, गाजर, टॉमेटो, या सर्वसामान्यांच्या पसंतीच्या भाज्या मात्र आवाक्यात (दहा रुपयेपर्यंत प्रति किलो) आहेत.

अति थंडीदेखील काही भाज्यांना मानवत नाही. विशेषत: वेलीवरील भाज्यांवर त्याचा जास्त परिणाम होतो. त्यामुळे मुंबईत येणाऱ्या भाज्यांच्या आवकमध्ये घट झाली असून भाज्यांच्या दरांत ३० ते ४० टक्के वाढ झाली आहे.

-कैलास तांजणे, अध्यक्ष, नवी मुंबई घाऊक भाजीपाला महासंघ, तुर्भे

भाज्यांचे दर

भाजी              घाऊक दर

भेंडी                       २८ ते ३२

दुधी भोपळा           २० ते २४

फरसबी                  २० ते २६

गवार                      ३० ते ३८

घेवडा                      २० ते ३०

शिराळी                    २० ते २६

वाटाणा                    २० ते २२

ढोबळी मिरची          २० ते २६

दर रुपये प्रतिकिलो

Story img Loader