पनवेल ‘आरटीओ’चा जिल्हाधिकाऱ्यांकडे जमिनीसाठी प्रस्ताव
वर्षांला ३०० कोटी रुपयांचे महसुली उत्पन्न असलेल्या पनवेल प्रादेशिक परिवहन विभागाने जड आणि अवजड वाहनांच्या चाचणीसाठी (फिटनेस सर्टिफिकेट) धावपट्टीचा (ट्रॅक) प्रस्ताव विभागाने रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. शिरढोण गावाजवळील साडेतीन हेक्टर (साडेनऊ एकर) जमीन त्यासाठी मिळावी, असे या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.
मागील आठवडय़ात प्रादेशिक विभागाने महसूल विभागाकडे ही जमीन मिळण्यासाठी परिवहन विभागाने प्रस्ताव पाठविला आहे.
पावसाळ्यात कळंबोली येथील लोखंड पोलाद बाजाराच्या कार्यालयाच्या इमारतीत दोन फूट पाणी साचले होते. त्यामुळे या विभागाला हक्काचे कार्यालय मिळावे यासाठी दोन वर्षांपासून करंजाडे टोलनाक्याजवळ अशाच प्रकारे जागा मिळाली आहे; परंतु सरकारी लालफितीच्या कारभारामुळे दोन वर्षांत जमिनीच्या हस्तांतरणाशिवाय प्रत्यक्षात इमारत बांधकामाला सुरुवात झालेली नाही.
सध्या विविध जड-अवजड वाहनांची तंदुरुस्ती चाचणीसाठी चालकांना वाहने खारघर येथील मोकळ्या जाग्यावर घेऊन जावी लागतात. तेथे मोकळ्या रस्त्यावर मोटार निरीक्षक संबंधित वाहनांची तपासणी करून प्रमाणपत्र देतात.
उच्च न्यायालयाने राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन विभागांना तपासणीसाठी हक्काची धावपट्टी तयार करण्याचे निर्देश नुकतेच दिले आहेत.यामुळे शिरढोण गावाजवळ तरुणांना नवीन रोजगार उपलब्ध होण्याची चिन्हे आहेत. ही जमीन मुंबई गोवा महामार्गालगत असल्याने वाहतूकदारांनाही हे सोयीचे ठिकाण होणार आहे.