नवी मुंबई : नियोजनबद्ध वसवलेल्या नवी मुंबई शहरात दिवसेंदिवस बेकायदा पार्किंगचा प्रश्न अतिशय बिकट बनला आहे. शहरात सर्वत्र दुतर्फा पार्किंग पाहायला मिळत असून यामुळे विविध विभागात वाहतुकीचा बट्ट्याबोळ झाला आहे. विशेष म्हणजे ‘नो पार्किंग’ च्या फलकाला अजिबात न जुमानता तेथेच वाहने उभी केली जात आहेत. शहरभर नो पार्किंग फलक नुसते नावापुरते उरले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या समस्येकडे नवी मुंबई वाहतूक पोलीस व पालिकेचेही दुर्लक्ष होत आहे.

नवी मुंबईचा ‘क्विन नेकलेस’ समजल्या जाणाऱ्या पामबीच मार्ग हा वेगवान व देखणा मार्ग म्हणून प्रसिद्ध आहे. याच मार्गावर वाशी रेल्वे उड्डाणपुल सोडताच वाशी उपनगराला सुरुवात होते. या उपनगराच्या पहिल्याच सिग्नलपासून ते कोपरी उड्डाणपुलापर्यंत बेकायदा पार्किंग पाहायला मिळते. त्यातच सतरा प्लाझा परिसरात बेकायदा पार्किंगने वाहतूक व्यवस्थेचा पुरता खेळखंडोबा करुन टाकल्याचे चित्र आहे सातत्याने दिसते. या मार्गावर स्त्यावरच बेकायदा पार्किंग ही पालिकेची व वाहतूक विभागाची डोकेदुखी ठरली आहे. शहरात याच ठिकाणी ‘व्हॅले पार्किंगचा’ फंडा सुरु झाल्याने वाशीतील सतरा प्लाझासह शहरातील विविध मॉल व कमर्शिअल पार्कसमोर वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडत आहे. नेरुळ उपनगरातही बेकायदा पार्किंगचा प्रश्न सातत्याने भेडसावत आहे.

शहरात ‘नो पार्किंग’चे फलक लागले आहेत त्या ठिकाणीही बेकायदा पार्किंग केले जात आहे. त्यामुळे नवी मुंबई शहरात पार्किंगची समस्या सातत्याने वाढत आहे. पालिकेने पार्किंगसाठी काही सुविधा निर्माण केल्या असल्या तरी त्या शहरातील वाहनांची संख्या पाहता तुटपंज्या आहेत. त्यामुळे विविध उपनगरात बेकायदा गॅरेज व इतर गाड्यांच्या विविध वस्तूंच्या दुकानांपुढे बेकायदा पार्किंग होत आहे.

नेरुळ येथील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर बेकायदा पार्किंग होत असताना दुसरीकडे स्टेडियमच्या पाठीमागील बाजूसही दोन्ही दिशेला ‘नो पार्किंग’ फलक लावले असताना या रस्त्याच्या दुतर्फा बेकायदा पार्किंग होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागकिकांनी वाहने चालवायची कोठून असा प्रश्न शहरातील विविध उपनगरांत पाहायला मिळत आहे.

दुपटीने वाढ

नवी मुंबईमधील अंतर्गत उपनगरात वाहतुकीचा व पार्किंगचा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. सतरा प्लाझा परिसरात दुपटीने बेकायदा पार्किंग होत आहे. त्यामुळे पालिका व वाहतूक विभागाने ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचे चित्र आहे. शहरातील बेकायदा पार्किंग वर कारवाई केली जाते. दुतर्फा केल्या जाणाऱ्या पार्किंगवर अधिक तीव्रतेने कारवाई करण्यात येईल तिरूपती काकडे, उपायुक्त, वाहतूक विभाग