लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

ठाणे : सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या बहुचर्चित हत्येप्रकरणाचा निकाल आज, शनिवारी पनवेल सत्र न्यायालयात लागणार आहे. या प्रकरणात ठाणे ग्रामीण पोलीस दलातील बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांच्यासह इतर आरोपी आहेत. या प्रकरणाचा काय निकाल लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून नऊ वर्षांपूर्वी घडलेले हे प्रकरण काय होते, हे जाणून घेऊया.

पोलीस दलात सहायक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या अश्विनी बिद्रे- गोरे यांची २०१५ मध्ये नवी मुंबईतील कळंबोली पोलीस ठाण्यात बदली झाली. मात्र त्या कंळबोली पोलीस ठाण्यात रुजू झाल्याच नाही. दीड वर्षांपासून त्या बेपत्ता होत्या. सांगलीत असताना अश्विनी बिद्रे- गोरे यांची पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांच्याशी ओळख झाली होती. कुरुंदकर आणि अश्विनी बिद्रे- गोरे यांच्यात वाद होता. या दोघांमधील वादाचे रेकॉर्डिंगही अश्विनी यांचे पती राजू गोरे यांच्या हाती लागले होते.

याशिवाय कुरुंदकर अश्विनी बिद्रे यांना मारहाण करतानाचा सीसीटीव्ही फुटेजही नुकताच समोर आला होता. तुझ्या पतीला गायब करणार, अशा धमक्या कुरुंदकर यांनी अश्विनी यांना दिल्या होत्या. अश्विनी यांच्या कुटुंबीयांनी कळंबोली पोलीस ठाण्यात कुरुंदकर यांच्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र पोलिसांनी कुरुंदकर यांच्यावर कारवाई केली नव्हती. यामुळे हे प्रकरण मुंबई हायकोर्टातही पोहोचले होते. हायकोर्टानेही अश्विनी यांचा शोध घेण्याचे आदेश पोलिसांना दिले होते.

काय प्रकरण होते

११ एप्रिल २०१६ रोजी अश्विनी बिद्रे यांची हत्या करून, शरीराचे तुकडे करून त्यांची विल्हेवाट लावल्याचा आरोप तत्कालीन पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर आणि त्याच्या साथीदारांवर आहे. बिद्रे यांच्या भावाने तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात अभय कुरुंदकर, ज्ञानदेव पाटील, कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यांना अटक करण्यात आली आहे. अश्विनी बिद्रे यांची हत्या केल्यानंतर त्यांचा मृतदेह वसई खाडीत वर्सोवा येथे टाकला असल्याची कबुली हत्ये प्रकरणातील एक आरोपी महेश फळणीकर याने दिली होती. मृतदेह खाडीत ज्या ठिकाणी फेकण्यात आला ती जागा आरोपीने पोलिसांना दाखवली होती. त्यानंतर नवी मुंबई पोलिसांनी नौदलाच्या मदतीने खाडीत मृतदेहाचा शोध घेतला. परंतु नौदलाच्या पाणबुडय़ांनी सलग दोन दिवस शोध घेतल्यानंतरही त्यांच्या हाती काहीच लागले नव्हते.

आज निकाल

मुख्य आरोपी बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याने अश्विनी बिद्रे यांची मीरा रोड येथील एक खोलीत हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचा आरोप आहे. या प्रकरणात ८० पेक्षा जास्त साक्षीदारांची तपासणी झाली असून सुनावणी जवळपास ७ वर्षे चालली आहे. पनवेल सत्र न्यायालयात आज, ५ एप्रिल २०२५ रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार असून दुपारपर्यंत निकाल लागण्याची शक्यता आहे.