शहराचे शिल्पकार म्हणून नावारुपास आलेल्या सिडकोच्या कामोठे, खांदेश्वर आणि खारघर या तीनही वसाहतींत सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या नियोजनातून हा महत्त्वाचा घटक सुटला कसा, याबद्दल नागरिकांमध्ये सध्या चर्चा आहे.
कामोठे येथे मागील अनेक वर्षांपासून रहिवासी सार्वजनिक स्वच्छतागृहाची मागणी करीत आहेत. ती अद्यापही पूर्ण झालेली नाही. या परिसरात येणाऱ्या नागरिकांना अन्य पर्याय नसल्याने रस्त्याकडील एखादा आडोसा पकडून नैसर्गिक विधी आटोपावे लागत आहेत.
कामोठे वसाहतीमधील एका ज्येष्ठ नागरिकाने पोलिसांनी घेतलेल्या बैठकीत आरोग्याचा कारण सांगत वसाहतीमध्ये स्वच्छतागृह असावे या मागणीकडे सिडको व पोलीस अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते. तरीही कामोठे येथे अजून सिडको एकही स्वच्छतागृह उभारू शकली नाही. उलट लाखो रुपयांच्या उलाढाल करणाऱ्या कामोठे ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन लहानशी मुतारी वसाहतीमध्ये काही ठिकाणी बांधल्या. अशीच काहीशी अवस्था खांदेश्वर वसाहतीची आहे. सेक्टर ९ येथील एका जागेवर सिडको स्वच्छतागृह बांधण्याचे नियोजित होते तेथे राजकीय पक्षाचे कार्यालय थाटल्याने येथेही स्वच्छतागृह उभा राहू शकले नाही. सेक्टर ९ येथे सिडको बांधत असलेल्या स्वच्छतागृहाला रहिवाशांनी दरुगधीमुळे विरोध केल्याने स्वच्छतागृहाचे बांधकाम बंद पडले. खारघर वसाहतीत ५४ सेक्टपर्यंत सिडकोचा विस्तार झाला असला तरीही संपूर्ण वसाहतीमध्ये दोनच शौचालये आहेत. किमान मुख्य चौकांमध्ये किंवा वसाहतीच्या मध्यवर्ती ठिकाणी किमान आठ शौचालये असावी अशी मागणी रहिवाशांकडून होत आहे.
भाजीविक्रेत्या महिलांना स्वच्छतागृह नसल्याने मोठय़ा त्रासाला तोंड द्यावे लागत आहे. खांदश्वर वसाहतीमध्ये पनवेल नगरपरिषदेचे नगरसेवक एकनाथ गायकवाड यांनी सिडकोकडून पाठपुरावा करून तीन शौचायले मंजूर केल्याचे सांगितले. तसेच त्यांपैकी दोन शौचालयांचे काम तांत्रिक अडचणींमुळे रखडले तर एका शौचालयाचे काम आसूडगावच्या एनएमएमटी आगाराच्या शेजारी सुरू आहे. याबाबत खारघर वसाहतीचे सिडकोचे अधीक्षक अभियंता प्रदीप डहाके हे म्हणाले, की खारघरमध्ये सेक्टर ४ व १४ मध्ये दोन शौचालये आहेत. रहिवाशांनी काही ठिकाणी विरोध केल्यामुळे प्रस्तावित शौचालये बांधण्यात अडचण आली आहे.
कामोठे येथे सेक्टर ११ येथील बाजारपेठेशेजारी व मँगो उद्यानाशेजारी सार्वजनिक शौचालये बांधण्याचे काम सिडकोने हाती घेतले आहे. येत्या तीन महिन्यांत ही शौचालये तयार होतील.
-किरण फणसे, अधीक्षक अभियंता सिडको