नवी मुंबई पोलिसांकडून बेदखल
परदेशात नोकरी करण्याचे अनेक तरुणांना आकर्षण असते. मात्र अनेकदा त्यात फसवणूक झाल्याचे प्रकार उघडकीस येतात. सानपाडा येथील एका एजन्सीमार्फत तेलंगणा येथील युवक एक लाख १५ हजार भरून दुबईत नोकरीसाठी गेला. मात्र तिथे सांगितल्याप्रमाणे सुविधा मिळत नाहीत. वेतनही मिळत नाही. एका घरात चौदा जणांना राहावे लागते. झोपण्यासाठी बंकरप्रमाणे जागा आहेत. अशा प्रकारे फसवणूक झाल्याने या तरुणाने संबंधित एजन्सीकडे तक्रार केली. मात्र त्या एजन्सीने त्याची दखल घेतली नाही. तेव्हा त्याने ट्विटरवरून नवी मुंबई पोलिसांकडे मदत मागितली, पण त्यांनीही टाळाटाळ केल्याचे उघड झाले आहे.
‘तुम्ही येऊन तक्रार करा, मगच गुन्हा नोंद होईल,’ असे उत्तर त्या फसवणूक झालेल्या युवकाला मिळाले. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांनी डिजिटलायझेशन केले. मात्र अशा तक्रारींची दखल घेतली जात नसल्याने त्यावर प्रश्न उपस्थित होत आहे.
निजामोद्दीन खान हा युवक मूळ तेलंगणा येथे राहणारा असून त्याने सानपाडा येथील ‘लियो इंटरप्रायजेस’द्वारे दुबई येथे नोकरी मिळवली. त्यासाठी त्याने १ लाख १५ हजार रुपये मोजले होते. त्या बदल्यात खान याला सुरक्षारक्षकाची नोकरी मिळाली. मात्र ज्या सुखसुविधांची खात्री एजन्सीने दिली होती, त्याच्या विपरीत तेथील परिस्थिती आहे.
एकाच रूममध्ये चौदा लोकांना राहावे लागत आहे. विशेष म्हणजे या चौदा जणांत एकच शौचालय आणि न्हाणीघर असून त्याची अवस्थाही अत्यंत वाईट आहे. झोपण्यासाठी बंकरप्रमाणे बेड आहेत.
याबाबत ज्या कंपनीत नोकरी देण्यात आली, त्यांच्या एचआरशी संपर्क करून परिस्थिती सांगण्यात आली. तेव्हा काही दिवसांत सुधारणा होईल, असे सांगण्यात आले. मात्र तसे झाले नाही. कंपनी पैसेही देत नाही.
माझ्या कुटुंबीयांसाठी काही तरी करावे या हेतूने मी ही नोकरी स्वीकारली. मात्र यात मी अडकलो आहे. मला मायदेशी येण्याची इच्छा आहे, अशी व्यथा खान याने ट्विटरवरून नवी मुंबई पोलिसांकडे मांडली. त्याने सानपाडास्थित एजन्सीसुद्धा मदत करण्यास तयार नाही, असेही सांगितले. त्यावर ‘तुम्ही जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करा’ असे उत्तर नवी मुंबई पोलिसांनी त्याला दिले. यावर मी दुबई येथे असल्याचे पुन्हा सांगितल्यावर नवी मुंबई पोलिसांनीही ‘जवळच्या पोलीस ठाण्यात जा, तेथील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांशी बोला. ते योग्य निर्णय घेतील,’ असे सांगत बेदखल केले.
याबाबत सानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास रामगुडे यांना विचारले असता, त्यांना पैसे घेऊन फसवले आहे. ते सध्या कुठे आहेत याची माहिती नाही. एक लाखांची फसवणूक झाली, अशी तक्रार खान यांनी केली आहे. पण ते सध्या कुठे आहेत याची माहिती नसल्याचे सांगितले.
याबाबत ट्विटर अकाऊंट सांभाळणारे साहाय्यक पोलीस आयुक्त प्रदीप कुन्नूर यांना विचारले असता, त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून संबंधित एजन्सीविरोधात गुन्हा नोंदवण्यास सांगितले आहे, अशी माहिती दिली.