जगदीश तांडेल , लोकसत्ता टीम
उरण : वाळवीग्रस्त जेएनपीटी बंदर विस्थापित कोळीवाडा ग्रामस्थांनी रविवारी गावात मोर्चा काढून आपल्या पुनर्वसनासाठी जेएनपीटी विरोधात आंदोलन पुकारण्याचा इशारा दिला आहे. यावेळी १६ मे २०२३ च्या रायगड जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत जेएनपीटीला केंद्रा कडून हनुमान कोळीवाडा गावाच्या पुनर्वसनाची मंजुरी मिळे पर्यंत पुढील तीन महिन्यांत प्रस्तावित भूखंडावर नागरी सुविधा उपलब्ध कराव्यात,त्याचप्रमाणे गावासाठी नवीन आराखडा तयार करणे,भूखंडा चा सातबारा उतारा तयार करणे आदींची अंमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्याची मागील पाच महिन्यात कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्याने संतप्त झालेल्या हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी गावात मोर्चा काढून जेएनपीटी प्रशासनाचा धिक्कार केला. यावेळी पुनर्वसन आमच्या हक्काचे, कोण म्हणतोय देणार नाही. घेतल्याशिवाय राहणार नाही. प्रकल्पग्रस्तांच्या एकजुटीचा विजय असो आदी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
हेही वाचा >>> पनवेल : मुंबई गोवा महामार्गावर वडखळ येथे वाहतूक कोंडी
१६ मे २०२३ रोजीच्या रायगड जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा जेएनपीटी प्रशासनाने अवमान केल्याच्या निषेधार्थ जेएनपीटी प्रकल्प विस्थापित शेवा कोळीवाडा गावातील महिलांचा कोणतीही पूर्वसूचना न देता मोरा त घारापुरी येतील हक्काच्या मासेमारी जमिनीत बेमुदत मासेमारी करण्याचा निर्धार केला असल्याची माहिती कोळीवाडा ग्रामस्थ मंडळाचे उपाध्यक्ष मंगेश कोळी यांनी दिली आहे. ग्रामस्थांच्या बैठकीत हा निर्णय घेतला असून गावात रॅली काढून आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. जेएनपीटी प्रशासनाने लवकरात लवकर जागेचा सातबार नावे केला नाही तर जेएनपीटी चा व्यवसाय बंद केला जाईल याची जबाबदारी जेएनपीटी प्रशासनाची राहील. असेही ग्रामस्थांनी जाहीर केले आहे. १९८५ ला जेएनपीटी बंदराच्या निर्मितीसाठी येथील कोळीवाडा गावाचे स्थलांतर करण्यात आले होते. या गावात मच्छिमार असल्याने त्यांचे पुनर्वसन उरणच्या बोरी पाखाडी या खाडी किनाऱ्यावर करण्यात आले होते. मात्र १९९० च्या दशकात या संपूर्ण गावाला वाळवी लागली. त्यामुळे गावातील घरे या वाळवीने पोखरल्याने कोसळू लागली आहेत. याच धोकादायक घरात येथील ग्रामस्थ जीव मुठीत घेऊन जीवन जगत आहेत. त्यांचे पुनर्वसन व्हावे या मागणीसाठी ग्रामस्थ जेएनपीटी प्रशासनाच्या विरोधात लढत आहेत. मात्र प्रशासन पुनर्वसनात चालढकल करीत असल्याने कोळीवाडा ग्रामस्थांनी पुन्हा एकदा समुद्रात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.