लोकसत्ता प्रतिनिधी

पनवेल : मुंबई आणि नवी मुंबईतील बांधकामांसाठी लागणारे दगड आणि खडी पुरवठा ज्या गावातील खदाणी आणि क्रशरप्लान्टमधून केला जातो, त्या कुंडेवहाळ आणि बंबावीपाडा गावांतील ग्रामस्थ सध्या धुळीच्या लोटांमुळे वैतागले आहेत. अनेकांना श्वसनाचे विकार जडले आहेत. रायगड जिल्हाधिकारी, पनवेलचे प्रांताधिकारी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी आमच्यासोबत गावात एक दिवस राहून दाखवावे अशी मागणी कुंडेवहाळ आणि बंबावीपाडा येथील हैराण झालेल्या ग्रामस्थांकडून केली जात आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रकल्पाचे काम कुंडेवहाळ आणि बंबावीपाडा या गावांच्या हाकेच्या अंतरावर मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. या प्रकल्पातील कामांमुळे या परिसरात जिल्हापरिषदेने आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेल्या रस्त्यावरून २० ते ४० मेट्रिक टनाची वाहतूक दिवसरात्र सुरू असते. विमानतळ प्रकल्पासोबत मागील अनेक वर्षांपासून गावालगत १२ क्रशरप्लान्ट सुरू आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने यातील ८ क्रशरप्लान्ट बंद करण्याच्या सूचना वीज महावितरण कंपनीला दिल्या आहेत.

आणखी वाचा-महायुतीच्या संकेतांना नवी मुंबईत खोडा? महापालिका निवडणुकीत शिंदे- नाईक मनोमिलनाची शक्यता धुसरच

दगड फोडणाऱ्या अनेक खदाणी चालकांनी सरकारी नियम भंग केल्याने त्यांच्यावर सुद्धा प्रांताधिकाऱ्यांकडून कारवाई सुरू आहे. प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी विविध सरकारी अधिकारी कारवाईमध्ये सातत्य असल्याचे सांगत असले तरी येथे राहणाऱ्या ग्रामस्थांची स्थिती अतिशय वाईट आहे. या परिसरातील वायू आणि प्रदूषणाची धोकादायक पातळी असून खदाणी आणि इतर ठिकाणी केलेल्या सुरूंग स्फोटांमुळे निवासी मालमत्तेचे संरचनात्मक नुकसान झाले असून गावकऱ्यांना श्वसनाचे विकार झाल्याचे निवेदन येथील ग्रामस्थांनी रायगड जिल्हाधिकारी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व इतर सरकारी कार्यालयांना दिले आहे.

प्रदूषण नियंत्रम मंडळाचे निर्देश धाब्यावर

२० डिसेंबरला प्रदूषण नियंत्रण मंडळाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पनवेलचे प्रांताधिकारी यांना लिहिलेल्या सूचनापत्रात या परिसरातील वायू प्रदूषण खराब श्रेणीत असल्याने हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी शासनाने ठरविलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याची सूचना केली होती. यामध्ये बांधकाम व इतर विध्वंसांतून महामार्ग वाहतूक, वाहनांची हालचाल, रस्त्यावरील धूळ, स्मशानभूमी, बेकरी येथील नियंत्रणासाठी पाऊले उचलल्याची सुचविले होते. ज्या प्राधिकरणांच्या अखत्यारीत विविध महामार्ग आणि रस्त्यांचे नियंत्रण येते ते संबंधित रस्त्यांची यंत्र किंवा मनुष्यबळाद्वारे सखोल स्वच्छता करावी, तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या मुख्य जंक्शनवर पाणी शिंपडून स्वच्छ करावे, असेही प्रदूषण नियंत्रण मंडळाने म्हटले होते. ७ दिवसांत यावर कारवाई करण्याचेही सांगितले होते. परंतु अशी कोणतीही कृती गावालगतच्या रस्त्यावर इतर सरकारी यंत्रणांनी केल्याचे दिसत नसल्याने ग्रामस्थांना धुळीतच रहावे लागते.

आणखी वाचा-नवी मुंबई एमआयडीसीतील सेवा रस्ता लगतचे भूखंड देणे घातक, वनमंत्री गणेश नाईक यांचे विधान

हवेतील गुणवत्तेमध्ये धुलीकणांचे अधिकचे प्रमाण असल्यामुळे एमपीसीबीच्या वरिष्ठ कार्यालयाने सूचित केल्याप्रमाणे यापूर्वीच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासह रायगड जिल्ह्याच्या इतर सरकारी यंत्रणांना धुलीकणांवर नियंत्रणासाठी मार्गदर्शक नियमावलीचे पालन करण्याची लेखी सूचना दिली आहे. कुंडेवहाळ आणि बंबावीपाडा येथील ८ क्रशर प्लान्टची वीज बंद करण्याच्या कार्यवाहीचे आदेश वीज महावितरण कंपनीला दिले आहेत. कारवाई केलेले क्रशरप्लान्ट बंद केले की नाही यासाठी पथक घटनास्थळी भेटसुद्धा देऊन लक्ष ठेवणार आहे. -संजय भोसले, प्रादेशिक अधिकारी, एमपीसीबी

Story img Loader