लोकसत्ता प्रतिनिधी
नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील बेलापूर ते ऐरोली या महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू असून या बांधकामांच्या ठिकाणी होणाऱ्या ध्वनी, वायू प्रदूषण तसेच ब्लास्टिंगबाबत वाढत्या तक्रारींमुळे नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींचे योग्य ते निराकारण होण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने समिती गठीत केली होती. या समितीमार्फत पालिकेने सव्वा महिन्यापूर्वी २६ ऑगस्टला प्रमाणित संचालन नियमावली अर्थात एसओपी जाहीर केली होती. परंतू पालिकेने ही नियमावली केल्यावर ही समिती फक्त कागदावरच असून बांधकाम व्यावसायिक मात्र एसोपीमध्ये दिलेल्या अटींचे उल्लंघन करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
नवी मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त या समितीचे प्रमुख आहेत. नवी मुंबई महापालिकेचे शिरीष आरदवाड यांच्याकडे शहर अभियंता व अतिरिक्त आयुक्तपदाचा कार्यभार असल्याने तेच या समितीचे प्रमुख आहेत. या समितीमार्फत नियमावली निश्चित केली असून प्रमाणित संचालन प्रक्रिया जाहीर प्रसिध्द करण्यात आली आहे. पण ही समिती फक्त नावापुरती उरली की काय असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. नवी मुंबई शहरात पुनर्विकासाचे तसेच नव्याने बांधकाम होऊ घातलेल्या बहुमजली इमारतींची कामे वाशी व सीवूड्स, नेरुळ विभागात मोठ्या प्रमाणात सुरू असून बांधकाम प्रकल्पांच्या आजूबाजूच्या नागरिकांना वेळीअवेळी होत असलेल्या यंत्रांच्या मोठमोठ्या आवाजामुळे ध्वनी, वायू प्रदुषण होते. पालिकेकडे याबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होतात. या तक्रारींच्या निवारणासाठीच ही नियमावली पालिकेने केली.
आणखी वाचा-सिडकोची घरे नवी मुंबईबाहेरच, रेल्वे स्थानकाजवळील घरांचे स्वप्न अधुरे
पालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी शहरातील बांधकामाबाबत, नियमावलींबाबत तसेच तक्रार निवारणाबाबत एक समिती निश्चित करुन त्याची एसओपी नियमावली तयार करुन नियमावली जाहीर केली आहे. अतिरिक्त आयुक्त २ हे समितीचे प्रमुख असून त्यांच्यासमवेत अतिरिक्त शहर अभियंता हे या समितीचे सदस्य सचिव तसेच विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त ,नवी मुंबई महापालिकेचे सहाय्यक संचालक नगररचना, सेन्ट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मायनिंग व तेल रिसर्चचे मुख्य शास्त्रज्ञ ,पेट्रोलियम व एक्सप्लोसिव्ह सेफ्टी ऑर्गनायजेशनचे प्रतिनिधी,महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियामक मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी आणि संरचना अभियांत्रिकी विभाग वीर माता जिजाबाई टेक्निकल इन्स्टिट्यूट माटुंगा मुंबईचे प्रमुख डॉ. केशव सांगळे समितीत असून त्यांच्याद्वारे नियमावली जाहीर केली आहे.
न्यायालयाच्या निर्देशानुसार सुर्योदयानंतर बांधकामांना सुरुवात करुन सूर्यास्तापर्यंत ही बांधकामे करणे योग्य असले तरी शहरात मोठ्या प्रमाणात अवेळी कामे सुरू असल्याचे पाहायला मिळते. रात्री उशीरापर्यंत मोठमोठ्या यंत्रांच्या धडधडीचा आवाज असह्य असतो. पार्किंग बंधनकारक केल्यामुळे नियमावलींच्या मर्यादांमुळे पार्किंगसाठी शहरात २ ते ३ मजल्यापर्यंत खाली खोदकाम केले जात आहे. सततच्या ब्लास्टिंगमुळे शेजारच्या सिडको वसाहतीमधील हजारो कुटुंबीय जीव मुठीत घेऊन जगत आहेत.
बांधकाम नियमावली अर्थात एसओपी जाहीर करण्यात आली असून याबाबत शहरातील सर्व विकासकांची बैठक घेऊन त्यांना सूचित करण्यात येणार आहे. या आठवड्यात शहरातील बांधकाम व्यावसायिंकांची बैठक घेऊन पालिकेची बांधकामाबाबतची नियमावाली त्यांना सांगण्यात येईल. बांधकाम व्यावसायिकांनी नियामावलीचा भंग केल्यास कारवाई केली जाणार आहे. -शिरीष आरदवाड, बांधकांम नियमावली समिती प्रमुख
ही नियमावली कागदावरच
- बांधकामाच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावणे अनिवार्य
- भूखंडावर १० मी. उंच जाळी लावणे
- धूळ प्रदूषणाबाबत दंडात्मक कारवाई
- बांधकाम साहित्याची वाहने ताडपत्रीने झाकलेली हवीत
- कामगारांनाही मास्क हवा
- धूळ रोखण्यासाठी वेट जेटचा वापर करावा
- खोदकाम तसेच बांधकामाबाबतची वेळ सकाळी ९ ते संध्याकाळी ६
- आरएमसी प्लान्ट करताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी अनिवार्य
- बांधाकामाच्या ठिकाणी ध्वनीपातळी तपासणी हवी
- वाहनांना जीपीएस प्रणाली हवी
- एका पाहणीवेळी प्रति चौ.मीटरप्रमाणे दंड आकरणी