नवी मुंबई : नवी मुंबई शहरात सिडकोच्या वतीने रेल्वे स्थानकाबाहेर पे अँड पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र याठिकाणी नियमांचे उल्लंघन करून पार्किंगच्या जागेत वाहने उभी करून व्यवसायिक वापर वाढत चालला आहे. नेरुळ मधील वाहनतळावर गॅस वितरणाचा व्यवसाय थाटण्यात आला आहे तर कोपरखैरणे रेल्वे स्थानकाबाहेर गाड्या उभ्या करून फेरीवाल्यांचा व्यवसाय सुरू आहे.
नवी मुंबई शहरात सिडकोकडून अद्ययावत अशी रेल्वे स्थानके उभारली आहेत. तसेच या रेल्वे स्थानकालगत प्रवाशी वाहन चालकांना वाहने पार्क करण्यासाठी सुलभ पे अँड पार्क तत्वावर वाहनतळ उपलब्ध करून दिले आहे. हे वाहनतळ खासगी ठेकेदारांच्या माध्यमातून चालविले जात आहेत. या करिता अटी शर्तीच्या अधीन राहून चालविण्यासाठी मुभा दिली आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत असून हे वाहनतळ व्यवसायिक जागा बनत चाली आहे. कोपरखैरणे रेल्वे स्थानकाबाहेर पार्किंगच्या जागेत टेम्पो उभा करून वडापाव विक्रीचा व्यवसाय सुरू आहे.
हेही वाचा >>> पनवेल : शांतता कमिटीच्या बैठकीत पोलिसांच्या चिरिमिरीचा जाहीर आरोप
तर नेरुळ येथील पे अँड पार्क मध्ये चक्क गॅस वितरणाचा व्यवसाय थाटण्यात आला आहे. त्यामुळे याठिकाणी आगीची घटना घडल्यास मोठा धोका उद्भवण्याची शक्यता आहे. या ठिकाणी वाहन पार्क करण्यासाठी आलेल्या वाहन चालकांना जागा भेटत नाही. तसेच या ठिकाणी भंगार रिक्षा व इतर जड वाहने उभी करून जागा अडवून ठेवली आहे. याकडे सिडको प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून इतर वाहन चालकांना याचा त्रास होत आहे. यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.