सार्वजनिक गणेशोत्सवाचे मंडप भर रस्त्यात उभारून धागंडधिंगा घालणाऱ्या मंडळांना न्यायालयाने घातलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमुळे आणि पोलिसांनी घेतलेल्या कडक भूमिकेमुळे यंदा चांगलाच चाप बसला आहे. शहरी भागांत मंडपांसाठी रस्त्यांवर होणारे खोदकाम यावर्षी टळले आहे. मात्र नवी मुंबईच्या कुशीत असलेल्या ग्रामीण व झोपडपट्टी भागात काही ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे नियम व अटी धाब्यावर बसविण्यात आल्याचे दिसत आहे. नवी मुंबई, पनवेल, उरण भागात एकूण १४१४ सार्वजनिक मंडळांना पोलिसांनी परवानगी दिली असून अनेक मंडळांच्या परवानगीचा खेळ शेवटच्या क्षणापर्यंत सुरू राहिल्याने गणेशोत्सव रद्द करण्याचा निर्णय काही मंडळांनी घेतला. महामुंबई विभागात सुमारे ६७ हजार ५०० घरगुती गणेशोत्सव आहेत.
गुरुवारपासून सुरू झालेल्या गणेशोत्सवाची धूम नवी मुंबईतही जोरात आहे. अनेक बडय़ा मंडळांनी दुष्काळग्रस्त भागांना मदत देण्याचा निर्णय घेतला असून काही मंडळांनी दुष्काळाची भीषणता सांगणारे देखावे उभे केले आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाने मंडळांना रस्त्यावर उत्सव साजरे करण्यास मज्जाव केल्याने महामुंबईतील ९७ मंडळांनी रस्त्याजवळच्या मैदानाचा पर्याय निवडला आहे. त्यामुळे या मंडळांमुळे होणारी वाहतूक कोंडी यावर्षी टळली आहे.
तुर्भे, ऐरोली, वाशी येथील मंडळांना मैदानाचा पर्याय उपलब्ध न झाल्याने मंडपाचे क्षेत्रफळ कमी करून त्यांनी रस्याचा २५ टक्के भाग आणि जवळच्या पदपथांचा आधार घेऊन मंडप उभारले आहेत.
शहरी भागात पोलिसांनी कडक कारवाईचे हत्यार उपसल्याने उत्सवाचे स्थलांतर किंवा क्षेत्रफळ कमी करण्याशिवाय मंडळांपुढे दुसरा पर्याय नव्हता पण ग्रामीण व शहरी भागात अनेक ठिकाणी विनापरवानगी रस्त्यात मंडप टाकण्यात आलेले आहेत.
दिघा विभागातील आझाद मित्र मंडळ, गणपती पाडा मित्र मंडळ, आणि शिवस्मृती मित्र मंडळांनी विनापरवानगी मंडप उभारले आहेत. काही ठिकाणी पालिका व पोलिसांनी कारवाई करण्याचा प्रयत्न केला पण या मंडळांना मैदानांचा पर्याय नसल्याने त्यांनी उत्सवाचा कालावधी कमी करून हा सण साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
नवी मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सवाला ३०-३५ वर्षांची परंपरा आहे. त्यात शहरी भागात मोकळी जागा बऱ्यापैकी असल्याने या मंडळांनी स्थलांतराचा पर्याय निवडला.
मात्र ग्रामीण भागात अनधिकृत बांधकामामुळे मोकळी जागा शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे ग्रामस्थ वगळता बाहेरील रहिवाशांनी स्थापन केलेला उत्सव रस्त्यावर आला आहे.
गतवर्षीपेक्षा यावर्षी गणेशोत्सव साजरे करणाऱ्यांची संख्या वाढली असून ती पंधराशेच्या आसपास गेली आहे. यात सोसायटीत गणेशोत्सव साजरे करणाऱ्यांचाही समावेश आहे. घरगुती गणेशोत्सवाच्या संख्येतही वाढ झालेली आहे.
महामुंबईत ५३ ठिकाणी विसर्जनाच्या जागा निश्चित करण्यात आल्या असून शुक्रवारी झालेल्या दीड दिवसाच्या विर्सजनाच्या वेळी सुसज्ज यंत्रणा दिसून आली.
ग्रामीण, झोपडपट्टी भागांत उत्सवी मंडळांकडून नियम धाब्यावर
गुरुवारपासून सुरू झालेल्या गणेशोत्सवाची धूम नवी मुंबईतही जोरात आहे.
Written by दीपक मराठे
First published on: 19-09-2015 at 01:27 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Violation of the law by ganesh mandal in slum and rural area