आरटीओची ‘स्पीड गन’च्या माध्यमातून नजर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पूनम सकपाळ

नवी मुंबई : भरधाव वाहनांमुळे होणारे अपघात ही शहरात गंभीर समस्या होत असून आता वेगमर्यादा न पाळणे वाहनचालकांना महागात पडणार आहे. नवी मुंबई प्रादेशिक परिवहनने ‘स्पीड गन’द्वारे आशा वाहनचालकांवर कारवाई सुरू केली आहे. गेल्या तीन दिवसांत पामबीच मार्ग, ठाणे बेलापूर मार्गावर ही कारवाई सुरू केली असून ४५ वाहनचालकांना दंड ठोठावण्यात आला आहे.

ही ‘स्पीड गन’ वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांना आपल्या कॅमेऱ्यात टिपणार असून वाहनचालकांवर ‘ई चलन’च्या माध्यमातून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. नियम न पाळल्यास एक हजार रुपये दंड वसुली करण्यात येणार आहे.

नवी मुंबईत वाहनचालकांकडून  भरधाव वाहन चालविण्याचे प्रमाण वाढले आहे. पामबीच मार्गावर वेगमर्यादेचे सर्रास उल्लंघन होत आहे. त्यामुळे अपघात होत असून अनेकांना जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे आशा वाहनचालकावंर लक्ष ठेवण्यासाठी ‘आरटीओ’ने स्पीड गन घेतली असून ती पामबीच सह इतर मुख्य रस्त्यांवर ठेवण्यात येणार आहे. तीन दिवसांपासून ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. पामबीच मार्गावर ६० किमी वेग मार्यादा असताना वाहनचालकांडून या नियमाची सर्रास पायमल्ली होत आहे. त्यामुळे पामबीच मार्गासह शीव-पनवेल व ठाणे-बेलापूर महामार्गावर भरधाव वाहनांवर ‘आरटीओ’ची नजर रहाणार आहे.

नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन विभागाला इंटरसेप्टर वाहन आणि त्या वाहनात स्पीड गन उपलब्ध करून देण्यात आली आहे. हे वाहन मुख्य मार्गावर दररोज फिरते राहणार आहे. वेगमर्यादेचा नियम मोडल्यास त्या वाहनाचा क्रमांक, वेग यासह छायाचित्राची छापील प्रत असलेले ई-चलन वाहनचालकांना त्यांच्या मोबाइलवर पाठविले जात आहे.

नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहनाच्या ताफ्यात आता स्पीड गन उपलब्ध झाली असून याच्या माध्यमातून शहरातील मुख्य रस्त्यांवर भरधाव वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे. हे रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. अपघातांचे प्रमाण जास्त असलेल्या रस्त्यांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे .

हेमांगी पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वाशी

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Violation speed limit costly motorists ysh
Show comments