पुनर्वसन रखडल्याने सावली ग्रामस्थांचा विरोध
नवी मुंबईचा श्वास बनलेल्या उद्यानांत आणखी एक मोठे उद्यान उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. घणसोली येथील सावली गाव स्थलांतर करून पालिकेने ३९ हजार १३५ चौ.मी. क्षेत्रफळावर हे सुसज्ज असे सेंट्रल पार्क उभारले आहे. मात्र, त्या गावाचे पुनर्वसन न केल्याने उद्घाटन करण्यास ग्रामस्थंनी विरोध केला आहे.
नवी मुंबई शहरात लहान-मोठी दोनशे उद्याने आहेत. यात नाग्रिकांचा मोठा राबता पाहावयास मिळत असून ही उद्याने नवी मुंबईकरांचा श्वास बनली आहेत. नागरिकांच्या पसंतीस उतरलेले वंडर्स पार्क, रॉक गार्डन, ज्वेल ऑफ नवी मुंबई यांच्या पंक्तीत उतरणारे हे उद्यान आहे. बहुतेक उद्यानांमध्ये मुलांना खेळण्यासाठी सुविधा उपलब्ध केल्या आहेत. अनेक ठिकाणी ओपन जिम ही संकल्पना राबवली आहे. या उद्यानातही जलतरण तलाव, स्केटिंग रिंग, जॉगिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक, मिनी फुटबॉल टर्फ, आकर्षक मानवी पुतळे आदी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुलांसह तरुणांसाठीही ते आकर्षण ठरणार आहे.
घणसोली सेक्टर ३ येथे १६ ऑगस्ट २०१४ पासून याच्या कामाला सुरुवात झाली. मात्र त्याजागी आधी वसलेल्या सावलीगाव येथील ग्रामस्थांच्या पुनर्वसन मागणीमुळे काम रखडले होते. कामाला एकूण १७ कोटी ५० लाख रुपये खर्च करण्यात आल असून ते पूर्ण तयार झाले आहे. मात्र, ग्रामस्थांचे सिडकोने पुनर्वसन करावे त्यांनतरच पार्कची उभारणी करावी, अशी सावली ग्रामस्थांची आजही मागणी आहे. उद्घाटनप्रसंगी विरोध होऊ नये यासाठी उद्घाटन केले नाही, अशी महिती महापौर जयवंत सुतार यांनी दिली.
सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना भेटून, सावली ग्रामस्थांचे पुनर्वसन लवकरात लवकर करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. भूखंड देण्यात येईल, असे आश्वासन सिडकोने दिले आहे. सावली गावचा पुनर्वसन प्रश्न संपल्यानंतर उद्घाटन करण्यात येणार आहे.
– जयंवत सुतार, महापौर, नवी मुंबई