उरण येथील उरण-पनवेल मार्गावरील खाडीपुलाच्या दुरुस्तीचे काम हे मे अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे आश्वासन सिडकोने दिले होते. मात्र भरतीचे पाणी आणि धिम्या गतीने सुरू असलेल्या कामामुळे पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे येथील चार गावांतील हजारो नागरिकांना आणखी काही महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.

दोन वर्षांपूर्वी नादुरुस्त म्हणून बंद करण्यात आलेल्या उरण-पनवेल महामार्गावरील खाडीपुलाच्या दुरुस्तीचे काम मे महिन्यात पूर्ण करण्याचे सिडकोने निश्चित केले होते. मात्र एप्रिल महिना संपत आला असतानाही काम धिम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे पुलाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होणार का, असा सवाल येथील नागरिक व प्रवाशांकडून केला जात आहे.

हेही वाचा >>>खारघर उष्माघात प्रकरणातील मृतांचा शवविच्छेदन अहवाल आला समोर; डॉक्टर म्हणतात, “त्यांच्या शरीरात…”!

उरण-पनवेल महामार्गावरील सिडकोच्या द्रोणागिरी नोड कार्यालयासमोरील फुंडे स्थानकाजवळील खाडीपूल नादुरुस्त झाला आहे. त्यामुळे जड वाहनांचा अपघात होण्याची शक्यता असल्याने हा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहतुकीसाठी बंद केला आहे. यामध्ये या मार्गाने ये-जा करणाऱ्या एसटी व एनएमएमटीच्या सार्वजनिक वाहतुकीच्या सेवा देणाऱ्या वाहनांनाही बंदी केली आहे. त्यामुळे या परिसरातील चार गावांच्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तर जड व अधिक उंचीच्या वाहनांनाही प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मात्र या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनांतील २० पेक्षा अधिक टेम्पोंना अपघात होऊन काही जण जखमी तर एका महिलेचा मृत्यूही झाला आहे.

हेही वाचा >>>खारघर दुर्घटना : चेंगराचेंगरीच्या कथित चित्रफितींमुळे नवा वाद, विरोधकांची सरकारवर कडाडून टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिडकोला आणखी किती बळी हवेत?

एप्रिल २०२० मध्ये सिडकोच्या फुंडे-उरण मार्गावरील खाडीपूल कोसळल्याने दीपक कासुकर या तरुणाचा या घटनेत मृत्यू झाला आहे. त्यानंतर उरणमधील सिडकोच्या सर्व खाडीपुलांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत उरण-पनवेल मार्गावरील प्रचंड रहदारीचा सिडको कार्यालयासमोरील खाडीपूल नादुरुस्त असल्याचे उघड झाले. त्यानंतर हा मार्ग जड व मोठ्या प्रवासी वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. मात्र मागील दोन वर्षांपासून या मार्गावरील अपघात सुरूच आहेत. मेअखेरपर्यंत काम पूर्ण करण्याचे आश्वासन सिडकोने ग्रामस्थांना दिले होते. मात्र एप्रिल संपत आला तरी हे काम अपूर्णच आहे. त्यामुळे काम होणार का, असा प्रश्न सिडकोच्या द्रोणागिरी नोडचे कार्यकारी अभियंता हनुमंत नहाने यांना केला असता, प्रयत्न सुरू आहेत. खाडीतील भरतीच्या पाण्यामुळे कामात अडथळा येत असून तो दूर करून काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली. तसेच मेपूर्वी काम पूर्ण होण्याची शक्यता कमीच असल्याचीही कबुली त्यांनी दिली आहे.