जगदीश तांडेल, लोकसत्ता
उरण : बहुप्रतीक्षित उरणच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी शासनाने मार्चमध्ये ८२ कोटींच्या खर्चाची मंजुरी देण्यात आली आहे. असे असले तरी हा निधी मिळविण्यासाठी लोकसभा आणि त्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणूक आणि आचारसंहिता यामुळे आणखी वर्षभराची प्रतीक्षा करावी लागणार असल्याने मागील पंधरा वर्षांपासून रखडलेले उरणचे रुग्णालय कधी होणार असा सवाल नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.
आरोग्य सुविधेसाठी अनेक आंदोलने केल्यानंतर शासनाने २०१० मध्ये दिलेल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या ८२ कोटी ५४ लाख रुपयांच्या प्रशासकीय खर्चाला अखेर मंजुरी दिली आहे. मात्र यासाठी उरणकरांना तब्बल दीड दशकांची प्रतीक्षा करावी लागली आहे. त्यामुळे उरण येथे शंभर खाटांचे श्रेणीवर्धित उपजिल्हा रुग्णालय तसेच अधिकारी व कर्मचारी इमारत उभी करण्यात येणार आहे.
आणखी वाचा-नवी मुंबई : प्रदूषण, पथदिव्यांमुळे फ्लेमिंगो मृत झाल्याचे निरीक्षण
लोकसंख्येचा विचार करता दिवसेंदिवस उरण परिसराचा झपाट्याने विकास होत असताना येथे आरोग्य सुविधांची वानवा आहे. उरणमध्ये सर्व सुविधांयुक्त असे १०० खाटांचे शासकीय उपजिल्हा रुग्णालय आणि त्या अनुषंगाने सुविधा देण्याची मागणी उरणकरांनी रस्त्यावर अनेक आंदोलने करीत उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून करण्यात आली होती.
उरणमधील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची दुरवस्था
उरण तालुक्यात एक ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय तर एक प्राथमिक आरोग्य केंद्र आणि चार उपकेंद्र आहेत. मात्र येथे अनेक समस्या आहेत. तर गरिबांना खासगी रुग्णालयाचा खर्च परवडत नाही. त्यामुळे उपचाराविना किंवा मुंबई, नवी मुंबई आणि पनवेल येथील शासकीय आणि महानगरपालिका रुग्णालयात धाव घ्यावी लागत आहे. त्यामुळे प्रस्तावित उपजिल्हा रुग्णालय उभारण्याची मागणी केली जात आहे