नवी मुंबई: देशभरात स्वच्छतेत नावलौकिक मिळवलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या कचरा व घनव्यवस्थापन विभागाने लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री बारा ते सकाळी पाच वाजेपर्यंत विशेष स्वच्छता मोहीम राबवून फटाक्यांचा व फुलांचा जवळजवळ २७ टन कचरा जमा केला आहे. त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी बेलापूर ते दिघा या सर्वच विभागांमध्ये आज सकाळी सर्वत्र शहर स्वच्छ पाहायला मिळाले.
घनकचरा विभागाचे उपायुक्त डॉक्टर बाबासाहेब राजळे व त्यांचे सर्व सहकारी यांनी आठ विभागात विभागवार प्रत्येकी ५० जणांची प्रत्येकी एक टीम याप्रमाणे विभागवार स्वच्छ दिवाळी या अनुषंगाने रात्रीची स्वच्छता मोहीम राबवली. परंतु स्वच्छ दिवाळी फटाके मुक्त दिवाळी अशी घोषणा व आवाहन सर्वत्र करण्यात येत असताना नागरिकांनी मात्र या घोषणाकडे दुर्लक्ष केल्याकडे केल्याचे पाहायला मिळाले.
उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार फक्त दोन तास फटाके वाजवण्याची मुभा असताना नवी मुंबईतही रात्री दीड ते दोन वाजेपर्यंत फटाक्यांचा आवाज सुरूच होता. परंतु दुसरीकडे नवी मुंबई महापालिकेने स्वच्छ शहर या अनुषंगाने रात्री बारा ते पाच या वेळेत राबवलेल्या स्वच्छता मोहिमेबद्दल नागरिकांकडून नवी मुंबई महापालिका व साफसफाई कर्मचाऱ्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री बारा ते पाच या वेळात नवी मुंबईच्या आठही विभाग क्षेत्रात ५० जणांची प्रत्येकी एक टीम याप्रमाणे फटाके व फुलांचा कचरा जमा करण्यात आला. पहाटे पाच वाजेपर्यंत ही विषय स्वच्छता मोहीम सुरू होती त्यामध्ये २७ टन कचरा जमा करण्यात आला आहे त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशीही नवी मुंबईतील रस्ते सकाळी स्वच्छ ठेवण्यात आले होते. – डॉ. बाबासाहेब राजळे, उपायुक्त नवी मुंबई महापालिका