एपीएमसी बाजारातील चौकात सप्टेंबरमध्ये उभारणी 

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वाशी बाजारात (एपीएमसी) उभारण्यात आलेले मनोऱ्यावरील घडय़ाळ तीनच महिन्यांत बंद पडले आहे. सध्या या घडय़ाळात वेगवेगळी वेळ दर्शविली जात आहे.

वाशी बाजारातील रामदास पाटील चौकात घडय़ाळासाठी १४ मीटर उंच मनोरा उभारण्यात आला आहे. त्यावर घडय़ाळ बसविण्यात आले आहे. चारही दिशांना हे घडय़ाळ वेळ दर्शवीत होते. यासाठी पालिकेने २० लाख रुपये खर्च केले आहेत, मात्र अल्पावधीतच हे घडय़ाळ बंद पडले आहे. शीव-पनवेल महामार्ग, पाम बीच रोड, वाशी, अरेंजा कॉर्नर या रस्त्यांना जोडले गेल्याने या भागात मोठय़ा प्रमाणात वाहने तसेच नागरिकांची वर्दळ असते. मात्र सध्या घडय़ाळ चुकीची वेळ दर्शवीत असल्याने अनेकांचा गोंधळ उडत आहे. मुंबईत स्वातंत्र्यपूर्व काळात मनोऱ्यावरील घडय़ाळे बसविण्यात आली आहेत. याच धर्तीवर स्मार्ट सिटी अर्थात नवी मुंबईत असा घडय़ाळ मनोरा उभारण्यात आला. गेल्या वर्षी मे महिन्यात या घडय़ाळाचा मनोरा उभारण्याच्या कामास आरंभ झाला होता. हा मनोरा निवडणूक आचारसंहितेत अडकू नये यासाठी पालिकेच्या वतीने तातडीने मनोऱ्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम न करताच तो सुरू करण्यात आला होता. तीन महिन्यांत याचे काम पूर्ण होऊन सप्टेंबरमध्ये सुरू करण्यात आले होते. टॉवरला चारही दिशांना घडय़ाळ आहे, मात्र चारही दिशांना वेगवेगळी वेळ दर्शविली जात आहे. मनोऱ्यावरील घडय़ाळ वीजपुरवठा होत नसल्याने सध्या बंद पडले आहे. याबाबत लवकरच विद्युत विभागाला माहिती देऊन ते सुरू केले जाईल, असे पालिकेचे तुर्भे विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज पाटील यांनी सांगितले.

 

Story img Loader