उरण : खारकोपर ते उरण ही बहुप्रतिक्षित लोकल सुरू होऊन अवघे सहा महिने झाले असून गुरुवारी झालेल्या जोरदार पावसामुळे उरणच्या स्थानकाच्या भुयारी मार्गात पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे हजारो प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. गतवर्षी अशाच प्रकारे पाणी साचले असतांना रेल्वेने पाणी उपसासाठी पंप लावूनही ही स्थिती निर्माण झाली आहे. मागील वर्षी उरण आणि द्रोणागिरी(बोकडवीरा) या दोन्ही स्थानकात पाणी साचल्याने लोकल सुरू होण्यापूर्वीच या मार्गावरील स्थानकांच्या कामांची पोलखोल झाली होती.

उरण लोकल सुरू होण्याची येथील नागरीक वाट पाहत आहेत. त्यातच यासाठी तारीख पे तारीख ही जाहीर झाल्यानंतर १२ जानेवारीला पंतप्रधानांच्या हस्ते या लोकल मार्गाचे उदघाटन झाले आहे. त्याचवेळी पहिल्याच पावसात नव्याने उभारण्यात आलेल्या स्थानकांत चार ते पाच फूट पाणी साचल्याने पावसाळ्यात या स्थानकांची स्थिती काय असणार याचे भविष्यच दिसू लागले होते.

हेही वाचा : पनवेलमध्ये १ मेट्रीक टन प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त

उरण व द्रोणागिरी दोन्ही स्थानकातील प्रवाशांच्या जीवाला धोका त्यातच पावसाळ्यात या दोन्ही स्थानकात पाणी साचल्याने या स्थानकातील विद्युत प्रवाहावर परिणाम होत आहे. त्यामुळे उरण व द्रोणागिरी ही दोन्ही स्थानके अंधारात जात आहेत. यावेळी प्रवाशांना याचा फटका बसण्याचा धोका निर्माण झाला आहे.