हार्बर रेल्वेवरील मानसरोवर स्थानकात ठणठणाट; कामोठेत निम्म्याने पुरवठा, आदिवासी पाडे तहानलेले
नवी मुंबईसह पनवेल, उरण परिसरात सध्या उठताबसता पाणी आणि पाण्याची च चर्चा सुरू आहे. रोज दहा हजार प्रवासी असणाऱ्या मानसरोवर स्थानकात तीन दिवसांपासून पाण्याचा एक थेंबही नाही. कामोठेत पाण्याचा पुरवठा निम्म्याहून कमी झाल्याने रात्री येणाऱ्या पाण्यासाठी जागरणे करावी लागत आहेत. पाणी थेट मार्गाने मिळत नसेल तर ते चोरून मिळविण्यासाठी पनवेल ते चिंचपाडा दरम्यानच्या जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीला छिद्र पाडली जात आहेत. उरणमधील दोन आदिवसी पाडय़ांतील उपसापंपातील पाण्याने तळ गाठल्याने आदिवासींची वणवण सुरू आहे. पण पाणी नसेल तर चिंतेचे कारण नाही. आम्ही तुम्हाला ते विकत देऊ, अशी जाहिरातबाजी करत काहींनी जारबंद पाण्याचा व्यवसाय सुरू केला आहे.

nmv08पाण्यासाठी जागरण
पनवेल : 
कामोठे वसाहतीत पाणीटंचाईमुळे रात्रीच्या वेळी प्रभागनिहाय पुरवठा केला जात आहे. त्यामुळे रहिवाशांवर जागरणाची वेळ आली आहे.
कामोठे वसाहतीमधील वाढलेल्या इमारतींच्या संख्येमुळे या वसाहतीला ४५ दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे, मात्र या वसाहतीला १९ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. यामुळे सिडकोचे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व रहिवाशांमध्ये नेहमी वाद झालेले पाहायला मिळतात. मोठी वसाहत आणि त्यामधील मतदारांची संख्या मोठी असल्याने ते दुखावले जाऊ नये, यासाठी आठ दिवसांत पाणीपुरवठा पूर्ववत होण्याचे स्वप्न दाखवत राज्यात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाने आणि शेतकरी कामगार पक्षाने रहिवाशांना रस्त्यावर उतरवून आंदोलने केली. या त्याचा एक भाग म्हणून सिडकोच्या अधिकाऱ्यांच्या अंगावर शाईफेकही करण्यात आली. काहींनी विंधणविहिरींचे आश्वासन दिले होते; परंतु रहिवाशांचा पाण्यासाठीचा संघर्ष संपलेला नाही.

उरणमधील दोन पाडय़ांत तीव्र पाणीटंचाई
उरण : उरणपासून काही अंतरावर असलेल्या भूऱ्याची व खैरकाठी वाडी या ३०० लोकवस्ती असलेल्या दोन वाडय़ांमध्ये पाणीटंचाई तीव्र झाली आहे. पाच हातपंपांपैकी सध्या एकच पंप सुरू आहे. एक हंडा पाणी मिळविण्यासाठी २० मिनिटे मेहनत घ्यावी लागत आहे. त्यामुळे दोन गावांतील नागरिकांच्या नशिबी रात्रीचे जागरण आले आहे. परिणामी महिलांना रोजगाराला मुकावे लागले आहे.
रानसई धरणाच्या काठावर बसलेल्या भूऱ्याची व खैरकाठय़ाची वाडी या दोन वाडय़ांना गेली अनेक वर्षे पाणीटंचाईत काढावी लागत आहेत. चिरनेरपासून पाच ते सहा, तर उरण शहरापासून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या या दोन वाडय़ा आहेत.

रेल्वे कर्मचाऱ्यांची फरपट
हार्बर रेल्वे मार्गावरील मानसरोवर स्थानकातील रेल्वे कर्मचाऱ्यांना दुपारचे जेवण घेण्यासाठी इतर स्थानकांत जावे लागत आहे, कारण या स्थानकात तीन दिवसांपासून पाण्याचा ठणठणाट आहे. टंचाईमुळे स्थानकातील प्रसाधनगृहात जाणे मुश्कील झाले आहे. मानसरोवर रेल्वे स्थानकातून रोज १० हजार प्रवासी प्रवास करतात. या स्थानकात स्वच्छता विभाग व इतर विभागांत मिळून २५ कर्मचारी काम करतात. तिकीट काऊंटर हा त्यापैकी एक विभाग आहे. सध्या कर्मचाऱ्यांना पाण्याचा बंदोबस्त करण्यासाठी इतर रेल्वे स्थानकांवर जाण्याची वेळ आल्याने काही दिवसांनी अशीच परिस्थिती राहिल्यास येथील तिकीट काऊंटर बंद ठेवण्याची वेळ येईल, अशी भीती एका कर्मचाऱ्याने व्यक्त केली.
मानसरोवर रेल्वे स्थानकाला पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी सिडको प्रशासनाची आहे. खारघर आणि खांदेश्वर या दोनही रेल्वे स्थानकांत पाणीपुरवठा व्यवस्थित होतो; परंतु या स्थानकात प्रवाशांसाठी उभारलेली पाणपोई कोरडी पडली आहे. मुळात रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी बांधलेल्या पाण्याच्या टाकीत सिडकोचे पाणीच येत नसल्याने या कर्मचाऱ्यांपैकी काही कर्मचारी यांना बाटलीबंद पाण्यावर तहान भागवावी लागत आहे अथवा इतर स्थानकांतून पाण्याच्या बाटल्या भरून आणण्याचे नवे काम या कर्मचाऱ्यांना करावे लागत आहे. याबाबत वेळोवेळी तक्रारी करूनही सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाने कोणतीही कारवाई केली नसल्याचे येथील रेल्वे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. याबाबत सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी भरत काजळे म्हणाले, की कामोठे वसाहतीमधील पाण्याचा दाब कमी असल्यामुळे हा घोळ झाला आहे. वसाहतीच्या शेवटच्या टोकाला स्थानक असल्याने कमी दाबाने पुरवठा होत आहे.