पनवेल : तळोजा औद्योगिक वसाहतीमधील पाणी संकटामुळे उद्योजकांच्या संघटनेमधील २५ कारखानदारांनी सोमवारी तळोजातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) कार्यालय गाठले. या कार्यालयातील अधिका-यांना भेटून संतापलेल्या उद्योजकांनी ‘पाण्याविना उद्योग कसे चालवायचे’ असा सवाल केला. दिड ते दोन हजार रुपयांना पाण्याचा एक टॅंकर खरेदी करुन उद्योग चालविणे कठीण झाले असून एमआयडीसी पाणी नाही देऊ शकतं, असं एकदा जाहीर करावे. म्हणजे कारखाने बंद करण्याचा विचार उद्योजक करतील असा संतापजनक प्रश्न उद्योजकांच्या प्रतिनिधींनी उपस्थित केला. उद्योजकांच्या पवित्र्यानंतर एमआयडीसीच्या स्थानिक अधिका-यांनी वरिष्ठांसोबत उद्योजकांची संयुक्त बैठक मंगळवारी आयोजित कऱण्याचे आश्वासन दिले आहे.
तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये साडेतीनशेहून अधिक रासायनिक कारखान्यांना ५३ दश लक्ष लीटर पाणी लागते. हा पाणी पुरवठा बारवी धरणातून केला जातो. मागील दोन वर्षांपासून उद्योजकांना पाणी पुरवठा सूरळीत होता. परंतू ५३ दश लक्ष लीटर (एमएलडी) पाण्याची आवश्यकता असताना अवघे ३८ एमएलडी पाणी पुरवठा होत असल्याने एमआयडीसीच्या अधिका-यांना विविध क्षेत्रात वेगवेगळ्या पद्धतीने पाणी पुरवठा करावा लागतो. या सर्व स्थितीमुळे मोठ्या आणि लघु उद्योगांचे हाल झाल्याची माहिती उद्योजकांची संघटना टीएमएचे खजिनदार दिलीप परुळेकर यांनी दिली.
हेही वाचा >>> मच्छिमार संस्थांना डिझेल मध्ये अनुदान द्या, केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्र्यांकडे मागणी
तसेच टीएमएच्या उपाध्यक्षा आणि दीपक फर्टीलायझर्स कंपनी समुहाच्या वरिष्ठ अधिकारी जयश्री काटकर यांनीही एमआयडीसी अधिका-यांना सरकारचे उद्योग स्नेही धोरण असताना तळोजातील उद्योगांना पाण्यासारखी पायाभूत सुविधा का दिली जात नाही, असा सवाल उपस्थित केला. टीएमएचे अध्यक्ष शेखर श्रुंगारे यांनी यापूर्वी बारवी धरणातून तळोजाला व्यवस्थित पाणी पुरवठा केला जात होता. त्यासाठी धरणातील ५३ एमएलडी पाण्याचा साठा आरक्षित होते. मात्र उद्योगांचे पाणी इतर ठिकाणी का फीरवले. त्यामुळे उद्योग पाण्याविना अशी स्थिती निर्माण झाली. पाणी टॅंकरने खरेदी करुन उद्योग चालविणे अव्यवहार्य असून यामुळे उद्योग बंद पडतील, या स्थितीत सरकारचे विविध कर आणि कामगारांचे पगार उद्योजक कसे भरु शकतील, अशी उद्योजकांची बाजू मांडली. याबाबत एमआयडीसीच्या अधिका-यांशी संपर्क साधला मात्र ते बैठकीत व्यस्त असल्याने संपर्क होऊ शकला नाही.