दुष्काळी मराठवाडा आणि विदर्भात पाणीटंचाई असल्याने तेथील मद्य बनविणाऱ्या कारखान्यांच्या इतर उद्योगांपेक्षा २० टक्के विशेष पाणीकपातीचा निर्णय सरकारने घेतला असला, तरीही तळोजामधील बीअर बनविणाऱ्या कंपनीला हा निर्णय लागू नसल्याचे औद्योगिक विकास महामंडळाने जाहीर केले आहे. सरकारने घेतलेल्या मद्य कारखान्यांच्या पाणीकपातीच्या निर्णयात ठाणे जिल्ह्य़ाला वगळल्याने तळोजामधील बीअर कारखान्याची पाणीकपात केली नसल्याचा खुलासा महामंडळाने केल्याने तळोजा व ठाण्यात पाणीटंचाई नसल्याचा संदेश एमआयडीसी प्रशासनाकडून देण्यात येत आहे.
जानेवारी महिन्यापासून तळोजा औद्योगिक क्षेत्रातील १२०० कारखान्यांना ४० टक्के पाणीकपातीला सामोरे जावे लागले आहे. यामध्ये बीअर बनविणारी बॉम्बे ब्रेव्हरिज (किंगफिशर ग्रुपची) विजय मल्या याची कंपनी आहे. तळोजातील कारखान्यांना व शेजारच्या गावांना ३८ ते ४० दशलक्ष लिटर पाण्याची गरज होती. मात्र पाणीटंचाईमुळे या कारखान्यांना आजमितीली बुधवारपासून ते शनिवापर्यंत पाणी मिळत नाही. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या पुढाकाराने तळोजातील उद्योगांची संघटना टीएमएच्या मागणीनंतर पाताळगंगा नदीतून ३ दशलक्ष लिटर पाणी या वसाहतीला मिळाल्याने २२ दशलक्ष लिटर पाण्याची सोय कशीबशी होऊ शकली. औद्योगिक विकास महामंडळाने जाहीर केलेल्या पाणीकपातीनुसार बुधवारी सायंकाळी बंद झालेले पाणी शनिवार सकाळी ६ला येणे अपेक्षित आहे. मात्र जलवाहिनीतून उद्योगांना पाणी मिळेपर्यंत शनिवारची दुपार उजाडते. त्यामुळे तळोजातील उद्योजक हैराण झाले आहेत. विदर्भातील पाणीटंचाईमुळे पाणी पिण्यासाठी, शेतीसाठी की उद्योगांसाठी या प्रश्नावर तोडगा काढताना सरकारने मद्य बनविणाऱ्या व बीअर कंपन्याचा पाणीकपात करण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र या विशेष कपातीमध्ये मल्या याच्या मालकीच्या या बीअर कंपनीला वगळण्यात आले आहे. ही कंपनी दरवर्षी बीअर निर्मिती करून सुमारे ७०० कोटी रुपये इतका अधिक महसूल उत्पादन शुल्क विभागाच्या तिजोरीत जमा करते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बीअर कंपन्यांच्या पाणीकपातीच्या निर्णयामधून ठाणे जिल्ह्य़ाला वगळल्यामुळे तो आदेश आम्हाला लागू होत नसल्याने तळोजातील बीअर कंपनीची विशेष पाणीकपात केलेली नाही.
– आर. बी. बेलगमवार, उपअभियंता, एमआयडीसी

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water cut decision not applied to liquor companies