रानसई धरणाचे पाणी कमी पडत असल्याने नोव्हेंबर मध्येच पाणी कपातीची वेळ

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उरण : तालुक्यातील नागरी वसाहत व औद्योगिक विभागला पाणी पुरवठा करणाऱ्या रानसई धरणातील पाण्याची साठवणूक क्षमता कमी झाल्याने महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ(एम आय डी सी) ने उरण मध्ये मंगळवार व शुक्रवार आशा दोन दिवसांच्या पाणी कापतीला सुरुवात केली आहे. तसेच पाणी जपून वापरण्याचेही आवाहन केले आहे. यामुळे उरणच्या नागरिकांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

उरण तालुक्याची लोकसंख्या नागरीकरणामुळे वाढू लागली आहे. त्यामुळे उरणला अधिकच्या पाण्याची गरज आहे. मात्र उरण मधील २३ ग्रामपंचायती तसेच नगरपरिषदेला ही येथील रानसई धरणातून पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र रानसई धरण ६० वर्षांपूर्वी उभारण्यात आले आहे. त्यावेळी या धरणाची क्षमता १० लाख दशलक्ष घनमीटर होती. या धरणात मागील ६० वर्षात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. या गाळा मुळे धरणाची पाणी साठवणूक क्षमता कमी होऊन ७ दशलक्ष घनमीटर वर आली आहे. एकीकडे पाण्याची मागणी वाढली असतांना पाणी साठा कमी झाला आहे. त्यामुळे एम आय डी सी ला पाणी पुरवठा कऱण्यासाठी सिडकोच्या हेटवणे धरणातून दररोज चे दहा एम एल डी पाणी उसने घ्यावे लागत आहे. मात्र सिडको कडून ही दररोज पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्याने पाणी कपात करावी लागत आहे.

रानसई धरणातील पाणी साठा वाढविण्यासाठी धरणाची उंची वाढविण्याची गरज आहे. मात्र हा उंचीचा प्रस्ताव दहा वर्षांपासून गुलदस्त्यात आहे. मात्र त्यामुळे उरणच्या नागरिकांना उसने पाणी व नोव्हेंबर पासूनच कपातीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे उरण मधील नागरिकांमध्ये असंतोष आहे. रानसई धरणातील पावसाचे पाणी थांबल्याने धरणाची पाणी पातळी कमी होण्याची शक्यता असल्याने वर्षभर पाणी पुरवठा करण्यासाठी ही पाणी कपात केली जात असल्याची माहिती उरण एम आय डी सी चे उपअभियंता रवींद्र चौधरी यांनी दिली आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water cut for two days in a week by midc in uran ysh