नवी मुंबई महानगर पालिकेकडे स्वतःच्या मालकीचे धरण आणि पुरेसा पाणीसाठा असतानाही मानवी चुकांमुळे अडीच दिवसापासून वाशीत अघोषित पाणीबाणी झाली आहे. विनापरवानगी खोदकाम केल्याने पाण्याची वाहिनी फुटल्याने व वेळेवर दुरुस्ती करण्यात अपयश आल्याने आता टँकरने पाणीपुरवठा करण्याची नामुष्की मनपावर आली आहे.
नवी मुंबईचे दादर म्हणून ओळख असलेल्या वाशीत तीन दिवसापासून पाणी नाही. सेक्टर ९ येथे जमिनीखाली केबल टाकणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीकडून पाण्याची वाहिनी फुटली. त्यावेळीही मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले. पाण्याची वाहिनीच फुटल्याने तेथील पाणीपुरवठा बंद करण्यात आला. मात्र त्यामुळे सद्यस्थितीत या वाहिनीद्वारा पाणी पुरवठा होत असल्याने सेक्टर ९, १० , १० अ, आणि १५ मध्ये पाणी पुरवठा बंद झाला आहे. वाहिनीचे दुरुस्ती काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आले असल्याचे मनपा पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात येत असले तरी आजचा तिसरा दिवस असून अजून हे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी पाणीपुरवठा बंद झाला अशा ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याची नामुष्की मनपावर ओढवली आहे.
हेही वाचा: उरण: अखेर दोन टनाची शिवकालीन तोफ द्रोणागिरी किल्ल्यावर
टँकरवर पाणी भरताना उडणारी तारांबळ व अपुरे टँकर यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे अशी प्रतिक्रिया सदानंद पाटील या सेक्टर ९ येथील राहिवशाने दिली.जमिनीखाली केबल टाकणाऱ्या एजन्सी कडून वाहिनी फुटली असून शक्य तेवढ्या लवकर दुरुस्त केली जाणार असून सध्या टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. खोदकाम साठी कुठलीही परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे विना परवानगी खोदकाम आणि झालेल्या नुकसान बाबत संबंधित व्यक्ती/ एजन्सी विरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे अशी माहिती वाशी विभागाचे सहाय्यक आयुक्त दत्तात्रय धनवट यांनी दिली.