कळंबोली वसाहतीमध्ये सिडको प्रशासनाने बांधलेल्या इमारती आणि बैठय़ा वसाहतींतील रहिवाशांना वर्षअखेरीस मीटरप्रमाणे पाणी बिल भरावे लागणार आहे. सिडको प्रशासनात याबद्दल जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. १० हजार नळजोडण्यांना मीटर बसविण्यासाठी सुमारे चार कोटी २५ लाख रुपयांचा निधी ठेवण्यात आला आहे.
मीटर खरेदी आणि ते नळजोडण्यांना बसविण्यासाठीच्या कामाबद्दल लवकरच निविदा काढल्या जातील. ऑक्टोबरमध्ये कळंबोलीत मीटर बसविण्याच्या कामाला सुरुवात होईल, अशी माहिती सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दिलीप बोकाडे यांनी दिली. सिडकोच्या या निर्णयामुळे सध्या महिन्याला अवघे ७५ रुपये पाणीपट्टी भरणाऱ्या कळंबोलीच्या रहिवाशांना तब्बल २५० रुपये प्रती महिन्याला पाणी बिल भरण्याची वेळ येणार आहे. मात्र पाण्याचा वापर कमी केल्यास पाणीपट्टीही कमी भरावी लागेल, असे सिडकोने स्पष्ट केले आहे.
सिडकोने नवीन पनवेल वसाहतीमध्ये बांधलेल्या पाच हजार सहाशे १२ सदनिका व बैठय़ा खोल्या आहेत. त्यातील चार हजार आठशे ७० सदनिकांच्या नळजोडणीला सिडकोने मोफतमध्ये मीटर बसवले आहेत. कोणतेही मीटर शुल्क आकारलेले नाही. पीएल ६ येथील इमारतींच्या सोसायटय़ांचा सिडकोशी कुंपणाच्या मुद्दय़ावर वाद असल्याने किंवा काही ठिकाणी पुनर्वसनाचे काम होणार असल्याने अशा सातशे ४२ सदनिकांच्या नळजोडणीला मीटर बसविण्यात आले नाहीत. यासाठी सिडकोने सुमारे दोन कोटी रुपये खर्च केला आहे. मीटर बसविण्याचे काम पूर्ण झाले असले तरीही नवीन पनवेलकरांना अद्याप पहिले पाणी बिल हातात मिळाले नाही. नवीन पनवेल व खांदेश्वर वसाहतीत मीटरप्रमाणे पाणी देण्याचा प्रयोग यशस्वी झाल्याने सिडको प्रशासनाने कळंबोली वसाहतीमध्ये बैठय़ा वसाहती व सिडकोने बांधलेल्या सदनिकांमध्ये पाणी मीटरप्रमाणे देण्याचे ठरविले आहे. सिडको कळंबोलीमध्ये सुमारे चार कोटी रुपये खर्चून सुमारे दहा हजार २३० नळजोडण्यांना येथे मीटर बसविणार आहे. कळंबोलीमध्ये अल्प आणि अत्यल्प उत्पन्न निकषावर माथाडी कामगारांना घरे मिळाली आहेत. सध्या कळंबोली परिसरातील खासगी गृहनिर्माण सोसायटय़ांमधील सदनिकाधारक मीटरप्रमाणे पाणी बिल भरतात. मात्र वर्षांनुवर्षे या वसाहतीमधील बैठय़ा वसाहतींमध्ये राहणारे रहिवाशी व सिडकोने वसविलेल्या इमारतींमधील रहिवाशांना अल्पदरात सरसकट पाणी बिल आकारले जाते. बैठय़ा वसाहतींमध्ये बांधकाम करून रहिवाशांनी एका घराला चार मजली घर बांधली आहेत. त्यामुळे एका नळजोडणीवर सुमारे सहा कुटुंबांची तहान भागवली जात आहे. त्यासाठी अवघे ७५ रुपये सिडकोला भरले जातात. सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालयाच्या मार्गावर बांधलेल्या तळमजल्यावर घरमालकांनी थेट गाळे उघडले आहेत. सिडकोने या गाळ्यांकडून व्यावसायिक दराने पाणी बिल घेण्याचे ठरविले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा