लोकसत्ता टीम
पनवेल: कळंबोली वसाहतीमध्ये भुरट्या चोरांचा सुळसुळाट सुरु आहे. काही दिवसांपूर्वी वसाहतीमधील रस्त्यांकडेला पहाटे दूध विक्रेत्यांचे दूधाच्या पिशव्या चोरी होण्याच्या घटना घडल्या होत्या. परंतु मागील दोन महिन्यात शंभराहून अधिक जलमापके (पाणी मीटर) चोरीस गेल्याच्या तक्रारी सिडको मंडळाच्या पाणी पुरवठा विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. नवीन जलमापके खासगी दुकानात २२०० रुपयांना मिळत असून रहिवाशी या भुरट्या चोरांना वैतागले आहेत. पोलीसही या चोरांचा शोध लावू शकले नाही.
पोलिसांनी संरक्षण कोणकोणत्या वस्तूंचे करावे, असा प्रश्न कळंबोलीत सर्वच स्तरावरुन विचारला जात आहे. काही भुरटे चोर वसाहतीमध्ये सक्रिय झाले आहेत. पाण्याची कमतरता असल्याने मागील आठवड्यात पाणी पुरवठा अनियमित होता. परंतु सध्या पाऊस चांगलाच बरसल्यानंतरही घराच्या नळाला पाणी येत नाही म्हणून रहिवाशांनी सिडको मंडळाचे पाणी पुरवठा कार्यालय गाठले. सिडकोच्या पाणी पुरवठा विभागातील कर्मचऱ्यांनी संबंधित सोसायटी अथवा घरांच्या जलवाहिनीची तपासणी केल्यावर त्यांना जलमापके गायब असल्याचे आढळले. सध्या अशा शंभराहून अधिक तक्रारी कळंबोलीच्या सिडको कार्यालयात रहिवाशांनी केल्या आहेत.
आणखी वाचा-पनवेल: कामोठेत रस्त्यातच मोठे तीन भगदाड
जय माता दी सोसायटीच्या सीमा म्हात्रे या पदाधिकाऱ्यांनी पोलीस स्थावर मालमत्तेचे संरक्षण करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे. पोलीस तक्रार लिहून घेत नसल्याचा आरोप म्हात्रे यांनी केला आहे. सिडको महामंडळाच्या पाणी पुरवठा विभागाने तीन वर्षांपूर्वी कळंबोली आणि नवीन पनवेल येथे लाखो रुपये खर्च करुन जलमापके लावून दिली होती. सिडको मंडळाने जलमापके स्वखर्चाने घरमालक किंवा गृहनिर्माण सोसायटीला बसवून दिलीत. या जलमापकांची सुरक्षा, निगा त्यानंतर मालमत्ताधारकांनी करायची. मात्र या प्रकरणात सिडकोने खर्च केलेली जलमापके चोरीस गेल्याने सिडको मंडळाने सामुहिक तत्वावर या भुरट्या चोऱ्या रोखण्यासाठी पोलीस ठाण्यात फीर्याद देणे गरजेचे झाले आहे.