उरण : समुद्रात टाकण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या लाखो टन कचऱ्यामुळे सागरी उदर सध्या कचराभूमीचे आगर बनू लागलं आहे. त्यामुळे समुद्रात जल प्रदूषण निर्माण होऊ लागले आहे. या कचऱ्या बरोबरच समुद्रातून चालणाऱ्या महाकाय जहाजांतून गळती होणाऱ्या तेलामुळे ही जलप्रदूषण वाढू लागले आहे. बंदरात येणाऱ्या अनेक जहाजातून जहाजावरील कचराही समुद्रात टाकला जात आहे. त्यामुळे जलप्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण होऊ लागली आहे.
कचरा समस्या सर्वत्र आहे. मात्र ही समस्या आता समुद्रात व किनाऱ्यावर वाढू लागली आहे. महाराष्ट्राला ७२० किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे. या किनाऱ्याची स्वच्छता व निगा राखण्याची आवश्यकता आहे. त्याकरीता अनेक समाजसेवी संस्था कडून किनारा स्वच्छता मोहिमा राबविल्या जातात. या मोहिमांमुळे किनाऱ्यावरील स्वच्छता होत असली तरी समुद्रात टाकण्यात येत असलेल्या कचऱ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपायोजना आवश्यक आहे. त्याशिवाय समुद्रातील प्रदूषणाला आला बसणार नाही. समुद्रात टाकण्यात येणारा कचरा हा निसर्ग नियमानुसार समुद्र किनाऱ्यावरच येत असल्याने प्रदूषणा बरोबरच किनाऱ्यावरील प्रदूषणात वाढ झाली आहे.
हेही वाचा : पनवेल : एका मृत उंदरामुळे ‘महाभारत’ , नातेवाईकांत हाणामारी, गुन्हा दाखल
मच्छिमारांना फटका
समुद्रातील वाढता कचरा व त्यामुळे होणारे प्रदूषण याचा फटका मच्छिमारांना बसू लागला आहे. अनेकदा मच्छिमारांच्या जाळात मोठ्या प्रमाणात कचरा येत आहे. त्यामुळे भर समुद्रात मासळीची जाळी ओढतांना मच्छिमारांची दमछाक होत आहे.