उरण: सप्टेंबर अखेरला रानसई धरणातील पाणीसाठा कायम असल्याने येत्या एप्रिल २०२४ पर्यंत पुरवठा करता येईल इतका साठा आहे. त्यामुळे उरणकरांची पाणी चिंता मिटली आहे. मात्र धरणातील पाणी साठवणूक क्षमता कमी झाल्याने दरवर्षी प्रमाणे जानेवारी महिन्यापासून पाणी कपातीचे नियोजन करावे लागणार असल्याचे संकेत एमआयडीसी ने दिले आहेत. त्यामुळे उरण मधील नागरिकांच्या पाण्याच्या कपातीचे संकट मात्र कायम आहे. यावर्षी जून महिना उजाडूनही पाऊस न आल्याने उरणकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता वाढली होती.
पाऊस लांबल्याने उरणच्या नागरीकांना पाणी पुरवठा करणाऱ्या रानसई धरणाच्या मृत साठ्यातून पुरवठा करण्यात येत होता. उरण तालुक्यातील एमआयडीसीच्या रानसई धरणाची पाणी पातळी दिवसेंदिवस वेगाने खालावू लागली आहे. उरणच्या औद्योगिक आणि नागरीकांना धरणातून दररोज ४० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जात आहे.
हेही वाचा… अखेर चिरनेर पुलाचे काम सुरु होणार; वाहतूक मार्ग बदल
रानसई धरणाची एकूण साठवणूक क्षमता ११६ फुटाची आहे. त्याचप्रमाणे दहा दशलक्ष घन मीटर पाणी साठवणूक क्षमता कमी होऊन ती सहा ते सात दशलक्ष घन मीटर वर आली आहे. तर धरणाची मृत साठ्याची पातळी ८५ फुटाची आहे. त्यामुळे एमआयडीसीला सिडकोच्या हेटवणे धरणातून मिळणाऱ्या रोजच्या सरासरी ५ दशलक्ष लिटर पाणी पुरवठ्यामुळे उरण मधील नागरीकांना जानेवारी महिन्यापासून आठवड्यातील मंगळवार व शुक्रवारी अशी दोन दिवसांची पाणी कपात करावी लागत आहे. यावर्षी झालेल्या पावसामुळे सप्टेंबर अखेर पर्यंत ११६.५ फुट धरणात पाणी असून एप्रिल २०२४ पर्यंत पुरवठा करता येईल इतका पाणी साठा असल्याची माहीती उरणच्या एमआयडीसीचे अभियंता विठ्ठल पाचपुंड यांनी दिली आहे. मात्र त्यांनतर ही धरणातून पुढील मे व जून महिन्यापर्यंत पाणी पुरवठा करण्यासाठी जानेवारी पासून पाणी कपातीचे नियोजन एमआयडीसीला करावे लागणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.