|| संतोष जाधव
नियोजन कोलमडले; शहरात गरजेपेक्षा जास्त तर झोपडपट्टीत अनियमित पुरवठा
राज्यात पाणीटंचाईची दाहकता वाढली असताना नवी मुंबईत मात्र पाण्याची उधळपट्टी सुरू आहे. स्वत:च्या मालकीचे धरण असल्याने मुबलक (नियमापेक्षा ५० लिटर प्रतिमाणसी जास्त) पाणी मिळत आहे. योग्य नियोजन नसल्याने शहरीभागात नियमापेक्षा जास्त तर झोपडपट्टीत अनियमित पाणीपुरवठा सुरू आहे.
स्वातंत्र्यानंतर स्वत:च्या मालकीचे मोरबे धरण असलेली नवी मुंबई देशातील एकमेव महापालिका. मोरबे धरणाची प्रतिदिन २५० दशलक्ष लिटर (तीस लाख लोकसंख्येला) पाणीपुरवठा करण्याची क्षमता आहे. मात्र शहराच्या १४.५० लोकसंख्येलाच ४४० दशलक्ष लिटर एवढी पाण्याची उधळपट्टी करण्यात येत आहे. प्रतिमाणसी २०० लिटर नियम असताना २५० लिटर पाणी दिले जात आहे, पण हे चित्र शहरी भागाचे आहे.
त्या मानाने परिमंडळ २ मधील दिघा, घणसोली, गोठवली राबाडा, ऐरोलीसह तुर्भे झोपडपट्टी परिसरात एमआयडीसीकडून पाणीपुरवठा होत आहे. आठवडय़ातील ६ तासांवरून २४ तासांच्या शटडाऊनमुळे या भागात अनियमित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे या भागातून पाण्यासाठी संताप व्यक्त होत आहे. याचे पडसाद गेल्या आठवडय़ात झालेल्या स्थायी समितीतही उमटले आहेत. योग्य ते तात्काळ नियोजन करून या भागात पाणीपुरवठा करावा अन्यथा महामोर्चाचा इशाराही दिला आहे.
सध्या मोरबे धरणात १५ ऑगस्टपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा आहे. परंतु २०१६ मध्ये करावी लागलेली पाणीकपात लक्षात घेता पाण्याचा वापर जपूनच करायला हवा. याबाबत आयुक्तांनी पाण्याबाबत योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
पाणीपट्टीपेक्षा देखभाल दुरुस्तीचा खर्च जास्त
शासकीय नियमानुसार देखभाल दुरुस्तीचा वार्षिक खर्च व पाणीबिलापोटी मिळणाऱ्या वसुलीचा ताळमेळ बसत नाही. पाणीपुरवठय़ासाठी वर्षांला १३५ कोटी खर्च येत असून पाणी बिलातून फक्त ८२ कोटी मिळत आहेत. पालिकेला वार्षिक ५२ कोटी २५ लाखांचा फटका बसत आहे. महापालिका क्षेत्रात घरगुती पाणीवापरासाठी प्रतिहजार लिटरला ४ रुपये ७५ पैसे व वाणिज्य वापरारासाठी ३० रुपये प्रतिहजार लिटरला आकारले जात आहेत.
काही ठिकाणी अतिरिक्त तर काही ठिकाणी पाणी जात आहे. त्यामुळे शहर अभियंता विभागाला प्रत्येक सोसायटी, विभागात किती पाणीपुरवठा होतो याची सर्व इत्थंभूत माहिती घेण्याचे आदेश दिले आहेत. नागरिकांनीही पाण्याचा अपव्यय टाळावा. पालिका पाणीपुरवठय़ाच्या तंतोतंत नियोजनाबाबत प्रयत्नशील आहे. – डॉ. रामास्वामी एन.,आयुक्त नवी मुंबई महापालिका
२०० लिटरच पाणी देण्याची आवश्यकता
- धरणात पाणी मुबलक आहे, म्हणून त्याचा वापर अधिक करण्यापेक्षा केंद्र शासनाच्या ‘सीपीएचईईओ’नुसार नवी मुंबई शहरात प्रतिमाणसी २०० लिटर पाणी देण्याची आवश्यकता आहे, परंतु पालिकेकडून अतिरिक्त पाणी दिले जात आहे.
- ६० दशलक्ष लिटर जास्त पाणीपुरवठा
- ४२४ दशलक्ष लिटर मोरबे धरणातून होणारा पाणीपुरवठा.
- ७३ दशलक्ष लिटर एमआयडीसीकडून होणारा पाणीपुरवठा.
- २८७ दशलक्ष लिटर १४.५० लोकसंख्येला पाणीपुरवठा.
- ५३ दशलक्ष लिटर शहरातील उद्याने व इतर वापरासाठी.
- ३५ दशलक्ष लिटर कामोठे, खारघर व इतर भागासाठी
- त्यामुळे शहरात आवश्यकतेपेक्षा ५० ते ६० एमएलडी जास्त पाणीपुरवठा होत आहे.