सुरळीत पाणीपुरवठय़ासाठी जलवाहिन्यांचा तुटवडा
नवी मुंबईतील सर्व भागांना २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी जलवाहिनी टाकण्याच्या कामाला अडथळय़ांचे ग्रहण कायम आहे. मोरबे धरणापासून पाणीपुरवठा करणाऱ्या कळंबोली ते दिघादरम्यानच्या जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतरही अंतर्गत जलवाहिनी टाकण्याची कामे रखडल्याने दिघा परिसरातील पाणीटंचाई कायम आहे.
मोरबे धरण पालिकेच्या ताब्यात आल्यानंतरही नवी मुंबईतील अनेक भागांना अजूनही पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. विशेषत: दिघा, तुर्भे, पावणे या झोपडपट्टीबहुल भागांत पाणीटंचाई जाणवते. येथील वसाहतींना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ अनेकदा येते. मात्र, तरीही या परिसरात जलवाहिन्यांचे जाळे पसरवण्याचे काम पूर्ण करणे प्रशासनाला शक्य झालेले नाही.
मोरबे धरणापासून पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी कळंबोली येथून दिघ्यापर्यंत नेण्याची काम पालिकेने पूर्ण केले आहे. मात्र, दिघा, तुर्भे, पावणे या परिसरात अंतर्गत जलवाहिन्या पसरवण्यात आल्या नसल्याने ही जलवाहिनी असून नसल्यासारखी आहे. जलवाहिनी टाकण्याचे काम एका राजकीय नेत्याच्या मर्जीतील ठेकेदाराला देण्यात आल्याचे सांगण्यात येते. त्यामुळेच या ठेकेदाराकडून होत असलेल्या दिरंगाईकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. जलवाहिनीच्या पाइपच्या टंचाईमुळे हे काम रखडल्याचे सांगितले जात आहे. मात्र, पाइपचा पुरवठा करण्यास सहा महिन्यांपासून ठेकेदाराने चालढकल चालवली आहे. विशेष म्हणजे, या ठेकेदाराला कामाची देयके मात्र नियमितपणे अदा केली जात असल्याचे सांगण्यात येते.
पाईप उत्पादन सुरू झाले आहे. शक्य तेवढय़ा लवकर काम संपवून पाणी पुरवठा सुरू करण्यात येईल. – सुरेंद्र पाटील, शहर अभियंता