पर्यायी स्रोत शोधण्यास नवी मुंबई महानगरपालिकेकडून सुरुवात
केवळ पावसाळ्यात माथेरान डोंगररांगांच्या कुशीतून येणाऱ्या पाण्यावर उभारण्यात आलेल्या मोरबे धरणावर अवलंबून न राहता पिण्याच्या पाण्यासाठी पर्यायी स्रोत शोधण्यास नवी मुंबई पालिका प्रशासनाने सुरुवात केली असून पाताळगंगा नदीचे पाणी जलवाहिनीद्वारे मोरबे धरणात आणण्याची संकल्पना पुढे येऊ लागली आहे. यंदा अपुऱ्या पावसामुळे राज्यात सर्वत्र पाणीकपात सुरू करण्यात आली आहे; परंतु जलसंपन्न पालिका म्हणून नावारूपास आलेल्या नवी मुंबई पालिकेलाही यंदा प्रथमच वर्षी ३० टक्के पाणीकपात करावी लागली आहे.
मुंबई पालिकेनंतर स्वत:चे धरण असलेली नवी मुंबई पालिका ही राज्यातील दुसरी जलसंपन्न पालिका म्हणून ओळखली जाते. खालापूर येथे पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या धावरी नदीवर जलसंपदा विभागाने हाती घेतलेले व नंतर निधीअभावी अर्धवट सोडलेले मोरबे धरण साडेचारशे कोटी रुपये देऊन विकत घेतल्याने नवी मुंबईत चोवीस तास पाणीपुरवठा केला जात होता, मात्र यंदा ही पाण्याची उधळपट्टी कमी करावी लागली आहे.
मोरबे धरण असलेल्या पाणलोट क्षेत्रात यंदा केवळ २२०० मिमी पाऊस झाल्याने पालिकेवर तीस टक्के पाणीकपात करण्याची वेळ आली आहे. सर्वसाधारणपणे हा पाऊस ३३०० मिमी होण्याची गरज होती, पण राज्यातच पाऊस कमी पडल्याने त्याला मोरबे धरण क्षेत्र अपवाद असण्याचे कारण नव्हते. नवी मुंबईकरांना मागील वीस वर्षांत पाणीटंचाईचा सामना पहिल्यांदाच करावा लागला असल्याने अचानक सुरू झालेल्या या पाणीकपात आणि टंचाईमुळे नवी मुंबईकर हवालदिल झाले आहेत. त्यात पाणीपुरवठा बंद करण्याचे राजकारणदेखील खेळले जात आहे. बारा लाख लोकसंख्येला दररोज मिळणाऱ्या साडेचारशे दशलक्ष लिटर पाणीपुरवठय़ाला कात्री लागल्यानंतर नवी मुंबईत ही स्थिती निर्माण झाली आहे, तर कधी काळी यापेक्षा जास्त पाणीकपात करावी लागली तर काय होईल याबाबत मागील आठवडय़ात झालेल्या जिल्हा नियोजन बैठकीत ओझरती चर्चा झाली. याच वेळी नवी मुंबई पालिकेचे स्वतंत्र मोरबे धरण असताना त्यांना बारवी धरणातील ४५ दशलक्ष लिटर पाणी घेण्याची काय आवश्यकता आहे, असाही एक मतप्रवाह व्यक्त करण्यात आला. महापालिका, एमआयडीसी वसाहतीसाठी बारवी धरणातून पाण्याचा उपसा करीत आहे. एमआयडीसीतील जलवाहिन्या या बारवी धरणाला जवळच्या असल्याने पालिकेने हा पर्याय खुला ठेवला आहे. त्यावर या जल नियोजन बैठकीत आक्षेप घेण्यात आला, पण नवी मुंबई पालिका स्वत:च्या मोरबे धरणातील ३२ दशलक्ष लिटर पाणी सिडकोला देत आहे. त्यामुळे कामोठे व खारघर या सिडको क्षेत्रांतील नागरिकांची तहान भागवली जात असल्याने ही देवघेव सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले, पण यामुळे मोरबे धरणाला पर्यायी स्रोताचा विचार करण्यास सुरुवात झाली आहे. भविष्यात एमआयडीसीने बारवी धरणातील पाणी उचलण्यास नकार दिल्यास पालिकेला पाण्याची व्यवस्था करावी लागणार आहे. त्यासाठी मोरबे धरणापासून १८ किलोमीटर अंतरावर असलेल्या पाताळगंगा नदीच्या पाण्याचा विचार केला जात आहे.
या नदीच्या पाण्यावर एमआयडीसी व जलसंपदा विभाग जवळपासच्या औद्योगिक वसाहतींना सांभाळून घेत आहे. त्यातून शिल्लक पाणी राहिल्यास नवी मुंबई पालिका ५० ते ५५ दशलक्ष लिटर पाणी उचलण्याचा विचार करीत असून त्यासाठी केवळ १८ किलोमीटरच्या जलवाहिनीचा खर्च करावा लागणार आहे. त्याचप्रमाणे नदीजवळ एक पंपहाऊस उभारावे लागणार आहे.
मोरबे धरणाला कोणत्याही कायमस्वरूपी नदीचा स्रोत नसल्याने हा विचार केला जात आहे. वाढत्या नागरीकरणामुळे नवी मुंबईला भविष्यात लागणाऱ्या पिण्याच्या पाण्याची तजवीज आत्तापासून करावी लागणार असल्याचे मत काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

मोरबे धरणाची खोली वा उंची वाढविण्याचा विचार मध्यंतरी केला जात होता, पण डोंगरातून येणाऱ्या पाण्याला मर्यादा असल्याने अशी उंची किंवा खोली वाढवून उपयोगाची नसल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे मोरबे धरणात इतरत्र स्रोतातून पाणी आणून टाकण्याच्या बाबीचा विचार करावा लागणार असून पाताळगंगा नदी हा एक जवळचा पर्याय आहे. त्याचा प्रशासकीय पातळीवर विचार सुरू आहे.
– अरविंद शिंदे, कार्यकारी अभियंता, पाणी विभाग, नवी मुंबई पालिका

Mumbai water supply cut
भांडूप, कुर्ला, अंधेरी, जोगेश्वरी ते वांद्रे परिसरातील पाणीपुरवठा बुधवारी बंद, ३० तासांसाठी पाणीपुरवठा बंद
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
pune water bill marathi news
पुणे : पुरवठ्या आधीच समाविष्ट गावांच्या पाणीपट्टीत वाढ ?
due to Atal Setu and Uran Nerul Local are supplying lowpressure water to high rises buildings in Dronagiri
द्रोणागिरी नोड मध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा, सिडकोवर टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ
Action plan for water transport in Mumbai news
मुंबईतील जलवाहतुकीसाठी कृती आराखडा
Water supply shortage in Malad West Goregaon West on January 25 due to leakage
गोरेगाव, मालाडमध्ये शनिवारी पाणीपुरवठा बंद
Navi Mumbai Municipal Corporation has no choice but to devise new sources for water supply in next five years
वाढीव पाण्यासाठी प्रयत्नांची शर्थ; भीरा धरण, बारवीच्या पाण्यासाठी बैठकांचे सूतोवाच
Khadakwasla, Kirkatwadi water purification, pune health department
खडकवासला, किरकिटवाडीला शुद्धीकरणाविनाच पाणी !
Story img Loader