महिला संतप्त;  सिडको कार्यालयात अधिकाऱ्यांना घेराव

पनवेल : नवीन पनवेल येथील सेक्टर १०च्या परिसरात राहणाऱ्या महिला व पुरुष रहिवाशांनी मंगळवारी सकाळी दहा वाजता पिण्यासाठी पुरेसे पाणी कधी मिळेल? हा जाब विचारण्यासाठी नवीन पनवेल येथील सिडको महामंडळाचे स्थानिक कार्यालय गाठले. सिडको मंडळाचे पाणीपुरवठा विभागाचे राहुल सरोदे यांनी या महिलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र अनेक महिने पाण्याशिवाय आपण अधिकारी तरी राहू शकाल का, असा प्रतिप्रश्न या संतप्त महिलांनी उपस्थित केला.

नवीन पनवेल वसाहतीमधील रहिवाशांची तहान भागविण्यासाठी ४२ दश लक्ष लिटर (एमएलडी) पाण्याची आवश्यकता आहे. मात्र या वसाहतीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून (एमजेपी) ३५ एमएलडी पाणीपुरवठा केला जात असल्याने अपुरा पाणीपुरवठा होत असल्याचे सिडको मंडळाच्या पाणीपुरवठा विभागाचे म्हणणे आहे. सेक्टर १० येथील रहिवाशांना पुरेसे पाणी मिळण्यासाठी या परिसरात सिडको मंडळाने १०० मिलिमीटर व्यासाची नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम मागील महिन्याभरापासून सुरू केले आहे. हे काम विलंबाने होत असल्याचा आरोप मंगळवारी संतप्त महिलांनी केला. मात्र जलवाहिनी बदलण्याचे काम योग्य पद्धतीने सुरू आहे. दीड किलोमीटर लांबीची आणि १०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे काम लवकरच पूर्ण होईल, असे सरोदे यांनी सांगितले.

या वेळी सेक्टर १० येथील कृष्णा अपार्टमेंट, निधी अपार्टमेंट, शिवसागर सोसायटी, अंकिता अपार्टमेंट, कृष्ण महल, कृष्ण दर्शन, रामराज महाडिक वास्तु सृष्टी, वास्तु सिद्धी, कमला पार्क, श्रीगणेश आराधना सोसायटींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी आपली व्यथा सिडको अधिकाऱ्यांसमोर मंगळवारी मांडली.

अवघे काही मिनिटेच पाणी

नवीन पनवेल वसाहतीसाठी ४२ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाण्याची आवश्यकता असताना सध्या जीवन प्राधिकरणकडून ३५ एमएलडी पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे पाणी अवघे काही मिनिटेच नळाला येत असून पाणी येण्याची वेळसुद्धा नियमित असल्याने महिलांची झोप उडाली आहे.

आम्हाला एमजेपीकडून होणाऱ्या अपुऱ्या पाणीपुरवठय़ामुळे आम्ही नागरिकांना जेवढे पाणी येते तेवढेच पुरवठा करण्याचा प्रयत्न करतो. एमजेपीने मागणीनुसार पाणी दिल्यास आम्ही पाच तास सलग पाणीपुरवठा रहिवाशांनी देऊ शकू.

– राहुल सरोदे, साहाय्यक अभियंता, सिडको मंडळ, पाणीपुरवठा विभाग