नैसर्गिक स्रोताचा शोध
नवी मुंबई पालिकेने घेतलेला २५ टक्के पाणीकपातीचा निर्णय शहरातील वृक्षसंपदा, उद्याने व दुभाजकावरील हिरवळीच्या मुळावर आला असून ही वृक्षवल्ली जगवण्यासाठी जवळच्या विहिरी, कूपनलिका, एसटीपी आणि तलावांचा आधार घेण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. या प्रकारे ३९ उद्यानांना पाणी देण्याची योजना प्रशासनाने आखली आहे. या उद्यानांना पुरवठा करणाऱ्या जलवाहिनींना या नैसर्गिक स्रोताचे पाणी जोडले जाणार आहे.
नवी मुंबईची निर्मिती करताना सिडकोने एकूण संपादित जमिनीपैकी ४६ टक्के जमीन मोकळी सोडली आहे. त्यामुळे नवी मुंबईत काही ठिकाणी वृक्षसंपदा दिसून येते. पालिकेच्या उद्यान विभागाने सिडकोकडून हस्तांतरित झालेल्या व नंतर स्वत: निर्माण केलेल्या एकूण १२२ उद्यानांवर हिरवळ सजवली होती.
जलसंपन्न पालिका म्हणून मिरवणाऱ्या पालिकेने या उद्यानांना व रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकांवरील हिरवळीलाही आतापर्यंत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात होता. त्यामुळे या झाडांना माळीबुवा ‘मुबलक’ पाणीपुरवठा करीत असल्याचे दृश्य अनेक वेळा पाहावयास मिळत होते. दुभाजक व उद्यानांना लावण्यात आलेल्या जलवाहिन्यांमुळे अनेक कुटुंबे व वाहने या पाण्यावर पोसली गेली आहेत.
राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीचा फटका नवी मुंबई पालिका क्षेत्राला यावर्षी पहिल्यादांच बसला आहे. त्यामुळे पालिकेने मोरबे धरणातून येणाऱ्या दैनंदिन ४२० दशलक्ष पाण्यावर २५ टक्के कपात सुरू केली आहे.

Story img Loader