नवी मुंबई शहराला प्रति दिन ४५० द.ल.लि. क्षमतेच्या स्वत:च्या मालकीच्या मोरबे धरण प्रकल्पामुळे नवी मुंबईची जलसमृध्द शहर अशीही ओळख निर्माण झाली असून यंदा मोरबे धरण क्षेत्रात कमी पाऊस झाल्याने शंभर टक्के धोरण भरले नव्हते. त्यामुळे सोमवारी ८३.२३ मीटर इतकी
पाण्याची पातळी असून सप्टेंबरपर्यंत पुरेल इतका जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे आजुबाजूच्या शहरांतील पाण्याची परिस्थिती पाहून नवी मुंबईकर नागरिकांनी पाण्याचे महत्व ओळखून गरजेपुरताच पाण्याचा वापर करावा असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेने केले आहे.
हेही वाचा- नवी मुंबई : दोन दिवसात तीन डान्सबारवर कारवाई
सन २०२१ मध्ये मोरबे धरण क्षेत्रात ४२२६.८० मि.मि. इतकी पर्जन्यवृष्टी झाल्याने १९०.८९ एम.सी.एम. जलसाठा धरणात जमा झाला होता. मात्र सन २०२२ मध्ये मोरबे धरण क्षेत्रात ३५५९.४० मि.मि. इतकीच पर्जन्यवृष्टी झाल्याने १३८.०८८ एम.सी.एम. इतका जलसाठा धरणात जमा झाला आहे. आजची धरणाची पातळी ८३.२३ मीटर इतकी असून गतवर्षी याच दिवशी म्हणजे ९ जानेवारी रोजी ही पातळी ८२.२३ मीटर इतकी होती. या जलसाठ्याव्दारे नवी मुंबईकरांना सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत सुलभपणे पाणी पुरवठा करणे शक्य आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राबाहेरील शहांच्या नागरी वसाहतींमध्ये सध्या केली जात असलेली पाणी कपात लक्षात घेऊन नवी मुंबईकर नागरिकांनीही पाण्याबाबत सतर्क राहणे गरजेचे आहे.
अनेक ठिकाणी पाणी वापरण्याबाबत नागरिकांकडून निष्काळजीपणा केला जात असल्याचे निदर्शनास येत आहे. सोसायट्यांमधील भूमिगत व टेरेसवरील जलकुंभ ओव्हरफ्लो होणे, गाड्या धुण्यासाठी पाईपव्दारे पाण्याचा वापर करणे, पिण्याच्या पाण्याचा वापर इमारतींचे आवार अथवा पॅसेज धुण्यासाठी करणे, रस्ते धुणे अशा विविध प्रकारे पिण्याच्या पाण्याची नासाडी होत आहे. याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी आसपासच्या शहरांतील पाणी टंचाई परिस्थिती लक्षात घेऊन आपल्याला लाभलेली पाण्याची संपन्नता काटकसरीने वापरावी व जल ही देखील एक प्रकारची संपत्ती आहे याचे भान ठेवून तिचा योग्यरीत्या वापर करावा असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्यावतीने करण्यात येत आहे.