लोकसत्ता प्रतिनिधी
उरण : येथील रानसई धरणातील पाणी साठा कमी होऊ लागला आहे. धरणात जून अखेरपर्यंत पुरवठा करता येईल इतकाच पाणी साठा उपलब्ध आहे. रानसई धरणातील पाणी साठवणूक क्षमता वाढत नसल्याने उरणच्या नागरिकांवर पाणी कपातीचे संकट वाढू लागले आहे.
रानसई धरणाची पाणी साठवणूक क्षमता कमी झाल्याने या धरणातून पावसाळ्यातील साडेतीन महिन्याचे लाखो लीटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे येथील नागरिकांना ऑक्टोबर – नोव्हेंबर महिन्यापासूनच वर्षोनुवर्षे पाणी कपातीचा सामना करावा लागत आहे. धरणाची पाणी क्षमता वाढविण्यासाठी एमआयडीसीने तयार केलेला प्रस्ताव अनेकवर्षे धूळखात बसला आहे. ही स्थिती बदलून उरणला पाणीदार करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
उरण तालुक्यातील नागरिकांना व येथील उद्योगासाठी लागणारे पाणी एमआयडीसीच्या रानसई धरणातून पुरविले जात असून उरणकराना दररोज ४१ दश लक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे. मात्र एमआयडीसीकडे केवळ ३० दश लक्ष लिटर पाणीच असल्याने दररोज १० दश लक्ष लिटर पाणी कमी पडत आहे. हा पाणीपुरवठा जून महिन्यापर्यंत करता यावा यासाठी पाणीकपात केली जात आहे.
रानसई धरणातील पाणीसाठ्याचे ३० जूनपर्यंत पुरवठ्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. मात्र उन्हाळ्यात होणारे बाष्पीभवन यामुळे पाणीसाठा कमी कमी होत आहे. त्यानुसार नियोजन सुरू आहे. -ज्ञानेश्वर सोनवणे, अभियंता, एमआयडीसी, उरण