पनवेल ः सिडको वसाहतींमध्ये मागील तीन दिवसांपासून पाणी पुरवठा बंद आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची दुरुस्तीची कामे सुरू असल्याने हा पाणीपुरवठा बंद होता. परंतु बुधवारी पाणीपुरवठा सुरू केल्यावर भिंगारी आणि नवीन पनवेल या दोन ठिकाणी जलवाहिनी फुटल्याने पुन्हा सहा तासांच्या दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. या सर्व कामांमुळे गुरुवारी सायंकाळी पुर्ववत होणारा पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी शुक्रवारी व शनिवारची सायंकाळ उजाडणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. त्यामुळे सिडको वसाहतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना जगावे कसे, असा प्रश्न पडला आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून (एमजेपी) मिळणाऱ्या पाणी पुरवठ्यानंतर सिडको महामंडळ विविध वसाहतींमध्ये पाणीपुरवठा करते. कळंबोली, नवीन पनवेल, खांदेश्वर वसाहत, काळुंद्रे आणि करंजाडे या वसाहतींमध्ये सोमवार ते मंगळवार या दिवसांमधील ३६ तास पाणीपुरवठा होणार नाही असे मागील आठवड्यात रहिवाशांना सूचना केली होती. एमजेपी प्रशासन रसायनी येथील पाताळगंगा नदीवरील पाणी सिडको महामंडळाच्या पाणीपुरवठा विभागाला देते. मात्र ही जलवाहिनी जिर्ण झाल्याने नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. सध्या कळंबोली ते आसूडगावपर्यंत जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. अजूनही नवी जलवाहिनी टाकण्याचे निम्मे काम म्हणजे ५० टक्के शिल्लक असल्याने दोन्ही जलवाहिनींच्या कमीजास्त असलेल्या व्यासामुळे पाण्याचा दाब जुनी जलवाहिनी पेलू न शकल्याने बुधवारी दोन ठिकाणी जलवाहिनी फुटली. अखेर गुरुवारी दुपारी साडेबारा वाजल्यानंतर पुन्हा सहा तासांच्या दुरुस्तीसाठी शटडाऊन घेऊन जलवाहिनी पूर्ववत करण्याचा प्रयत्न एमजेपीकडून सुरू आहे. पुन्हा पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी अजून २४ तास लागण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – नवीन पनवेल येथे जलवाहिनी फुटली; लाखो लीटर पाणी वाया
एका टॅंकर पाण्यासाठी केवळ १२० रुपये
सिडको महामंडळाच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिडको वसाहतींमध्ये सात वेगवेगळे टॅंकर पाणीपुरवठा करण्यासाठी आरक्षित ठेवले आहेत. पाणीपुरवठा अत्यंत कमी होत असलेल्या गृहनिर्माण सोसायटीच्या मागणीनंतर सिडको महामंडळ १२० रुपये आकारून एक टॅकर पिण्याचे पाणी देत आहे. सिडको मंडळ वाहतुकीचा खर्च रहिवाशांकडून आकारत नाही. सिडको मंडळाच्या स्थानिक वसाहत कार्यालयात याबाबत तक्रार केल्यानंतर तेथील पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी खात्री केल्यानंतर संबंधित गृहनिर्माण संस्थेला टॅंकरने पाणीपुरवठा करतात अशी ही योजना आहे. खासगी टॅंकर या परिसरात दिड ते दोन हजार रुपयांना मिळतो.
पाण्याची झळ स्मशान भूमीतही
गुरुवारी सकाळी कळंबोली येथे राहणाऱ्या ७८ वर्षीय पार्वती रामचंद्र चांदिवडे यांचे वृद्धपकळाने निधन झाल्याने त्यांचे पार्थिव अंत्यविधीसाठी कळंबोली येथील स्मशानभूमीत आणले होते. पार्थिव आणल्यानंतर वारसदार प्रकाश चांदिवडे यांचे मुंडण झाले. हातपाय धुण्यासाठी काही ओंजळ्या पाणी मिळाले मात्र मुंडण केल्यानंतर वारसदार प्रकाश यांना अंगावर घेण्यासाठी पाणी मिळू शकले नाही. स्मशानभूमीमध्ये विविध कामे सुरू आहेत. मागील ३६ तासांच्या जलवाहिनीवरील शटडाऊनमुळे येथील टाकीतील पाणी संपले होते. अखेर चांदिवडे यांच्या नातेवाईकांनी खरेदी करून २० लीटर पाण्याचा बाटला आणून त्याव्दारे पुढील विधी आटोपला.
एमजेपीने सर्व नियोजनकरून जलवाहिनीवरील दुरुस्तीसह इतर कामे मागील ३६ तासांत पूर्ण केली. जलवाहिनीवरील पुरवठा पुन्हा सुरू झाल्यानंतर नवीन पनवेल येथील पंचशीलनगर झोपडपट्टीलगत जलवाहिनीला गळती लागल्याचे समजले. या परिसरात झोपडपट्टीधारकांकडून काम करू दिले जात नाही. आम्ही त्यांना याअगोदरसुद्धा गळती असलेल्या ठिकाणी दुरुस्ती करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची सूचना केली आहे. पनवेल महापालिकेला यासाठी पत्रव्यवहार केला आहे. – विजय सूर्यवंशी, अभियंता, एमजेपी