लोकसत्ता प्रतिनिधी
नवी मुंबई: उशीराने सुरु झालेल्या पावसामुळे नागरीकांना यंदाच्या पाणीपुरवठ्याबाबत चिंता सुरु झाली. मागील अनेक दिवसापासून विभागवार एक दिवस संध्याकाळचा पाणीपुरवठा केला जात नाही.
सोमवारी संध्याकाळी नेरुळ, तसेच बेलापूर विभागात पाणीतुटवडा जाणवला. तर मंगळवारी सकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे नागरीकांचे हाल झाले. त्यातच मंगळवारी पालिकेच्या जलशुद्दीकरण केंद्र असलेल्या भोकरपाडा केंद्राच्या ठिकाणी मंगळवारी दुपारी १ वाजल्यापासूनच महाराष्ट्र राज्य विद्युत पुरवठा विभागाचा वीजपुरवठा खंडीत झाल्यामुळे संपूर्ण शहरात मंगळवारी रात्री होणारा पाणीपुरवठा होणार नसल्याची शक्यता पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने वर्तवली आहे. याचा परिणाम म्हणून बुधवारी सकाळी शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यावरही परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.
हेही वाचा… पनवेल: चुलत्याचा खुनाप्रकरणी फरार असलेल्या आरोपीला सात वर्षांनी अटक
नागरीकांना पाणी जपून वापरावे असे आवाहन पालिकेने केले आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यातही नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र नवी मुंबईत पाहायला मिळत आहे.