मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात उष्णतेचा चटका कमी झाला आहे. तसेच अंदमान बेटे आणि दक्षिण बंगालचा उपसागर परिसरात मान्सूनचा पाऊस धडकला आहे. येत्या काही दिवसांत केरळ आणि महाराष्ट्रात देखील नैऋत्य मोसमी वारे धडकण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात मुंबईसह आसपासच्या भागात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबण्याच्या घटना घडतात. अशा घटना टाळण्यासाठी नवी मुंबई महानगर पालिकेनं देखभाल दुरुस्तीची कामं हाती घेतली आहेत.
याचाच एक भाग म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेच्या (NMMC) हद्दीतील मोरबे धरण ते दिघा मेनलाइन दरम्यान देखभाल दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे. परिणामी नवी मुंबई महानगरपालिका आणि सिडकोच्या काही भागात उद्या (२४ मे) पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. २५ मे रोजी सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा सुरळीत केला जाणार आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी आवश्यक असेल इतका पाणीसाठा करून ठेवावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.
देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी भोकरपाडा शुद्धीकरण केंद्राचा पाणीपुरवठा मंगळवार (२४ मे) रोजी खंडित केला जाणार आहे. यामुळे बेलापूर, नेरूळ, वाशी, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली या भागांत २४ मे रोजी सायंकाळी पाणीपुरवठा होणार नाही, असे महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
तसेच सिडकोच्या हद्दीतील खारघर आणि कामोठे परिसरातही पाणी पुरवठा खंडित केला जाणार आहे. २५ मे रोजी सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होईल. दरम्यानच्या कालावधीत पुरेल इतकं पाणी नागरिकांनी साठवून ठेवावं आणि त्याचा काटकसरीने वापर करावा, असं आवाहन महापालिकेने केले आहे.