नवी मुंबई : गेल्या महिन्यात नवी मुंबई ते मुंबई ही वॉटर टॅक्सीसेवा सुरू करण्यात आली. मात्र या सेवेचे तिकीट दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने नाराजी व्यक्त होत होती. अर्थसंकल्पात दर कमी करण्याची घोषणा करण्यात आली होती. यानुसार कमीत कमी ८० आणि जास्तीत जास्त १२० रुपये दर कमी होणार आहे. यासाठी राज्य सरकारने या प्रवासासाठी लागू केलेला दहा टक्के प्रवासी कर माफ करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.

मुंबई पोर्ट ट्रस्ट, महाराष्ट्र सागरी मंडळ आणि सिडको अशा तीन यंत्रणांनी हा वॉटर टॅक्सी प्रकल्प प्रत्यक्षात आणला असून नवी मुंबई (नेरुळ) ते मुंबई (भाऊचा धक्का) अशी सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र  बेलापूर ते भाऊचा

धक्का हे अंतर अवघ्या ३० मिनिटांत पूर्ण करणाऱ्या स्पीड बोट सेवेसाठी ८२५ ते १२१० रुपये इतके एकेरी भाडे आकारण्यात येत आहे तर, हेच अंतर ५० मिनिटांत पार करणाऱ्या ‘कॅटामरान’साठी २९० रुपये इतके भाडे मोजावे लागत आहे. त्यामुळे सामांन्य प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होत आहे. आमदार मंदा म्हात्रे यांनीही दर कमी करण्याची मागणी राज्य शासनाकडे केली होती. त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात या सेवेचे दर कमी करण्याचे जाहीर केले होते. मात्र दर किती कमी होणार याची उत्सुकता होती. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकारने या प्रवासासाठी दहा टक्के इतका प्रवासी कर लागू केला होता. तो कर पुढील काही कालावधीसाठी माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे समजते. यानुसार भाडे ८० ते १२० रुपयांनी कमी होऊ शकते.

Story img Loader