नवी मुंबई : नवी मुंबई ते अलिबाग हे अंतर केवळ सव्वा तासात पार करता येणार आहे. बेलापूर ते मांढवा पर्यत वॉटर टॅक्सी सेवा सुरु करण्यात आली आहे. आज (शनिवारी) सुरु झालेल्या या वॉटर टॅक्सीचा लाभ २१ प्रवाशांनी घेतला असून सध्या ही सेवा केवळ शनिवार-रविवार सुरु असणार आहे.
अलिबाग गेल्या काही वर्षांपासून पर्यटन स्थळ म्हणून उदयास आले आहे. विस्तीर्ण आणि स्वच्छ समुद्र किनारे , सूर्योदय-सूर्यास्ताचे नयनरम्य दृश्य , अलिबाग किल्ला व आसपासचे कोकण वैभव याचा आनंद घेण्यासाठी मुंबई ठाणे परिसरातील पर्यटकांची पाउले वीकएंड येताच अलिबाग कडे वळतात. मात्र रस्ते मार्गाने जाण्यासाठी अडीच ते तीन तास लागतात. तसेच काही ठिकाणी अरुंद व खराब रस्ते असल्याने गाड्यांची गर्दी झाली तर वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागतो.
ही परिस्थिती पाहता वॉटर टॅक्सी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. नयनतारा शिपिंग कंपनीने मेरिटाईम बोर्डाच्या परवानगीने ही सेवा सुरु केली असून आज (शनिवारी ) पहिली फेरी रवाना झाली आहे. याचा लाभ २१ प्रवास्यांनी घेतला. यासाठी प्रती प्रवासी ३०० रुपये भाडे आकारण्यात आले असून बोटीची प्रवासी क्षमता ही २०० आहे अशी माहिती नयनतारा शिपिंगचे कॅप्टन रोहित सेन्हा यांनी दिली. काही आठवड्यातच याला उत्तम प्रतिसाद मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. तसेच जलमार्गांना प्रोत्साहन देण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणजेच या मार्गावर वॉटर टॅक्सी सेवेला परवानगी देणे आहे. अन्य मार्गांचीही चाचपणी सुरु आहे अशी माहिती मेरिटाईम बोर्ड अधिकारी संजय शर्मा यांनी दिली आहे.
हेही वाचा:उरण शहर व परिसरावर भरदिवसा पसरली धुक्याची चादर; धुके की प्रदूषण नागरिकांमध्ये शंका
बेलापूर येथून सकाळी ८ वाजता सदर वॉटर टॅक्सी निघणार असून सकाळी ९.१५ वाजता मांडवा येथे पोहोचेल तर संध्याकाळी ६ वाजता मांडवा येथून वॉटर टॅक्सी निघेल आणि रात्री ७.४५ वाजता बेलापूर जेट्टी येथे पोहोचेल. या सेवेसाठीच्या ऑनलाईन बुकींगला २३ नोव्हेंबर रोजी सकाळ पासून सुरुवात झाली आहे.