|| विकास महाडिक
नवी मुंबईकरांना मेट्रोसह नेरुळ-भाऊचा धक्का जलवाहतुकीचा पर्याय
नोव्हेंबरमध्ये सुरू होणारी नवी मुंबई मेट्रो, विमानतळासाठी लागणारे सपाटीकरण, नेरुळ ते भाऊचा धक्कापर्यंतची जलवाहतूक, मुंबईत वीस मिनिटांत पोहोचविणारी हावरक्राफ्ट, पामबीच मार्ग विस्तार या प्रकल्पामुळे दळणवळणाच्या दृष्टीने नवीन वर्षे महामुंबईला लाभदायक ठरणार आहे. याशिवाय महागृहनिर्मिती, सायन्स पार्क, दोन मोठी रुग्णालये, बहुउद्देशीय वाहनतळ, तुर्भे, जुईनगर येथील उड्डाणपूल हे पालिकेच्या वतीने उभे राहणारे प्रकल्प महामुंबईला वेगळी दिशा देणारे ठरणार आहेत.
सिडकोच्या वतीने तळोजा परिसरात ९० हजार घरांचा आराखडा तयार केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महागृहनिर्मितीचा नुकताच शुभारंभ करण्यात आला आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी गृहनिर्मितीला पहिले प्राधान्य दिले आहे. महामुंबई क्षेत्रात बांधण्यात येणाऱ्या या घरातील ३५ टक्के घरे ही आर्थिकदृष्टय़ा दुर्बळ नागरिकांसाठी राखीव आहेत. याशिवाय सिडको मागील सोडतीत शिल्लक राहिलेली ११०० घरांची विक्री या महिन्यात करणार आहे.
या महागृहनिर्मिती बरोबरच नवी मुंबई मेट्रोचे काम अंतिम टप्यात आले असून तळोजा येथील एका उड्डाणपुलाची अडचण आहे मात्र नोव्हेंबर अखेपर्यंत बेलापूर ते पेंदार दरम्यान धावणारी मेट्रो सुरू होण्याची शक्यता आहे.
विमानतळाला जोडणारा न्हावा शेवा ते नवी मुंबई खाडी हा ८०० कोटी रुपये खर्चाचा खाडी रस्ता तयार करण्याचे काम सिडको हाती घेणार आहे. खारघर येथे १२० हेक्टर जमिनीवर बीकेसीच्या धर्तीवर कॉर्पोरेट पार्क तयार करण्याचे काम याच वर्षी सुरू होणार आहे. त्याचा आराखडा तयार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा वास्तुविशारद नियुक्त करण्यात आला आहे.
नैना क्षेत्रातील पाण्याची गरज भागविण्यासाठी सिडकोने कर्जत तालुक्यातील कोंढाणे धरणासाठी जलसंपदा विभागाला वित्तपुरवठा सुरू केला आहे. चारशे कोटी या धरणासाठी देण्यात आले आहे पण त्याचे अद्याप काम सुरू झालेले नाही ते या वर्षी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नैना क्षेत्राचा दुसरा आराखडाही यंदा मंजूर होणार आहे.
सिडकोच्या या महाप्रकल्पाबरोबरच नवी मुंबई पालिकेने शहर नियोजनाचे काही प्रकल्प हाती घेतले आहेत. मोठमोठे नवीन प्रकल्प हाती घेण्यापेक्षा आहेत ते प्रकल्प मार्गी लावण्याचे धोरण आयुक्त डॉ. रामास्वामी यांनी ठरविले आहे. यात नेरुळ येथील वंडर पार्कमधील जागेत पाच एकरवर अद्ययावत असे सायन्स पार्क बांधण्याचा चंग पालिका प्रशासानाने बांधला आहे. त्याच्या कामाला या वर्षी सुरुवात होणार आहे. याशिवाय सिडकोकडून कत्तलखान्यासाठी घेण्यात आलेल्या २२ एकर जमिनीवर पालिका या वर्षी अद्ययावत कत्तलखान्याचे काम हाती घेणार आहे. डॉक्टर आणि नर्सेस भरती झाल्यानंतर ऐरोली व नेरुळ येथील रुग्णालये पूर्ण क्षमतेने मार्च अखेपर्यंत सुरू होणार आहेत. शहरातील पायाभूत सुविधांच्या वार्षिक देखभालीची कामे एकाच वेळी दिली जाणार आहेत. नवी मुंबईत आता शहर नियोजन झालेले आहे, पण त्यांची वार्षिक देखभालीचे महत्त्वाचे काम शिल्लक राहणार आहे. शहरातील अंतर्गत वाहतूक कोंडी टाळता यावी यासाठी सीबीडीला वळसा घालून थेट पामबीचला जोणारा वाहतूक पर्यायी व्यवस्था केली जाणार आहे. नवी मुंबईतील वाहनतळ ही एक मोठी समस्या आहे. त्यासाठी बेलापूरमध्ये पाच मजली बहुउद्देशीय इमारतीचे रखडलेले काम यंदा सुरू होणार असून त्याची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. पामबीचचा विस्तार ऐरोली ते कोपरखैरणे हा रस्ता खारफुटीमुळे रखडला आहे. न्यायालयाने विकासकामासाठी काही अटी शिथिल केलेल्या आहेत. त्यामुळे शहरातील वाहतुकीला पामबीच हा पर्यायी मार्ग खुला करणार आहे.
यंदा पालिकेचा स्वतंत्र विकास आराखडा
शहराचा विकास आराखडा तयार करण्याचे काम २७ वर्षांनंतर हाती घेण्यात आले आहे. पालिकेचा नियोजन विभाग हे काम करीत आहे. ते अंतीम टप्यात असून यंदा पालिका आपला स्वतंत्र विकास आराखडा सादर करणार असून सर्वसाधारण सभा आणि जन सुनावणी नंतर तो शासनाच्या मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे. हे एक महत्वाचे पाऊल पालिकेच्या वतीने पडणार आहे.
डिसेंबरअखेर विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात
नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम डिसेंबरअखेर अंतिम टप्प्यात येण्याची शक्यता आहे. याच वर्षी या विमानतळाच्या धावपट्टीवरून पहिले उड्डाण होणार असल्याचे अगोदर जाहीर करण्यात आले होते, पण प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा तिढा अद्याप न सुटल्याने हे उड्डाण मार्च २०२० पर्यंत होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.
मरिना जेट्टीमुळे जलवाहतुकीला चालना
बेलापूर येथे सिडकोच्या वतीने बांधण्यात येणाऱ्या मरिना जेट्टीमुळे जलवाहतूकीला चालना मिळणार असून नेरुळ ते भाऊचा धक्का दरम्यान राज्य मेरीटाईम बोर्डाच्या वतीने नियमित जलवाहतूक सुरू केली जाणार आहे. याच वर्षी जलवाहतुकीला प्राधान्य देताना वाशी व बेलापूर ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत बंद पडलेली हावरक्रॉफ्ट सेवा सुरू केली जाणार आहे.