‘झाडे आहेत, तर त्यांना पाणी घालावेच लागेल, पाण्याविना त्यांना जाळायचे का?’ हा खडा सवाल आहे नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनावणे यांचा. या त्यांच्या प्रश्नाला पाण्यावाचून झाडे जाळून चालणार नाही, असं सोपं उत्तर देताही येईल; परंतु त्यांनी हा प्रश्न नेमका पाणीटंचाईच्या काळात विचारल्याने उत्तर अधिकच कठीण होऊन बसले आहे. ऐरोली येथील सेक्टर -१४ मध्ये असलेल्या जॉगिंग ट्रॅकभोवतीच्या सुशोभीकरणाच्या जागेत एका पालिका कर्मचाऱ्याकरवी पिण्याचे पाणी छोटय़ा वृक्षांना, रोपांना घातले जात होते आणि प्रत्यक्ष महापौर त्या ठिकाणी होते. यंदा पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना नवी मुंबई महानगरपालिकेनेच ‘जल है तो कल है’ या अभियानाला सुरुवात करून पाणी बचतीचा मंत्र नागरिकांना देण्यास सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत महापौरांच्याच हजेरीत पाण्याचा अपव्यय होत असल्याने अस्वस्थ झालेल्या काही संवेदनशील नागरिकांनी त्यांच्याकडे विचारणा केली. त्यावर महापौरांनी पाणीवापराचे समर्थन केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे अशाच पद्धतीने महापौरांच्या रबाळे येथील प्रभागातही पिण्याच्या पाण्याची मोठय़ा प्रमाणात चोरी होत असल्याचे आढळून आले आहे.
भविष्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पालिकेने ३० टक्क्य़ांपर्यंत पाणीकपात सुरू केली आहे. उद्यान, दुभाजकांवरील सुशोभीकरणावर येथील वृक्षसंपदा जगविण्यासाठी शहरातील पारंपरिक पाणी स्रोत्रांचा वापर सुरू केला आहे. त्यात कूपनलिका, विहिरी, आणि तलावांचा समावेश आहे. पालिकेने करोडो रुपये खर्च करून शहरात चार ठिकाणी एकत्रित सांडपाणी प्रक्रिया केंद्रे उभारली आहेत. त्यातील पाण्यावर प्रक्रिया केल्याने ते पिण्याजोगे होत असल्याचा दावा केला जात आहे. या पाण्याला पालिकेला गेली कित्येक वर्षे गिऱ्हाईक न मिळाल्याने ते पाणी आता उद्यान, मैदान, आणि दुभाजकांवरील वृक्षसंपदेच्या कामी येणार आहे. त्यासाठी या केंद्रावरून टँकरद्वारे पाणी आणून या वृक्षसंपदेच्या जवळ ठेवण्यात आलेल्या टाक्यांमध्ये टाकले जात आहे. या वृक्षसंपदेची देखभाल करणाऱ्या कंत्राटदारांच्या माळ्यांनी त्या टाकीतील पाणी या झाडांना टाकणे गरजेचे आहे; मात्र ऐरोली सेक्टर १४ येथील (बर्न हॉस्पिटल जवळील) जॉगिंग ट्रॅकजवळील रोपटय़ांना बुधवारी एक पालिका कामगार चक्क जवळील पिण्याच्या पाण्याच्या जलवहिनीला पाइप लावून पाणी मारत असल्याचे दिसून आले. नवी मुंबई पालिकेने पिण्याचे पाणी शहरातील सुशोभीकरणातील झाडांना देता यावे यासाठी जलवाहिन्या टाकलेल्या आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्याने त्या वाहिनीला पाइप लावून पाणी शिंपडण्याचे काम सुरू ठेवले होते. त्याला हे पाणी पडवळ नावाच्या पालिका अधिकाऱ्याने मारण्यास सांगितले असल्याचे त्याने स्पष्ट केले.
ट्रकजवळ लावलेल्या झाडांना उतार असल्याने मारलेले पाणी वाहून जात होते. याच मार्गावरून नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनावणे व ऐरोलीतील समाजसेवक अंकुश सोनावणे हे मॉìनग वॉक करीत होते, पण या दोन्ही समाजसेवकांना पाण्याचा हा अपव्यय दिसला नाही. यासंर्दभात मॉìनग वॉकसाठी आलेल्या नागरिकांनी त्यांना विचारले तर ‘झाडे काय जाळून टाकायची’ असे उत्तर महापौरांनी दिले.
सोनावणे राज्यात पडलेल्या १९७२ च्या दुष्काळाच्या नगर भागातील एका दुष्काळग्रस्त गावातून नवी मुंबईत पोटापाण्यासाठी आलेले आहेत. त्यामुळे पाण्याचे महत्त्व त्यांच्यापेक्षा दुसऱ्या कोणाला जास्त कळणारे नाही, पण पाण्याचा अपव्यय करण्यात आघाडीवर असलेल्या नवी मुंबईकरांच्या यादीत आता महापौरांचाही क्रमांक लागला आहे. त्यांच्या प्रभागात येणाऱ्या डोंगरावर त्यांनी नगरसेवक असताना चांगली झाडे लावली असून त्यांच्यासाठी कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था केली आहे. मात्र महापौर झाल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी खोदलेल्या तलावाच्या ठिकाणीही अनेक वेळा पाण्याचे कारंजे उडत असल्याचे आढळून आले आहे. त्यांच्या रबाळे येथील (डोंगरी) प्रभागातील अनेक रहिवाशी जवळच्या मोठय़ा जलवाहिनी पाइप लावून पाणी चोरी करीत असल्याचे दिसून येत आहे. सायकलवर फिरून सकाळी प्रभागाची पाहणी करणाऱ्या व त्यानिमित्ताने पर्यावरणाचा संदेश देणारे महापौर पाण्याचा होणारा अपव्यय उघडय़ा डोळ्यांनी बघतात याबद्दल आश्चर्य व्यक्त केले गेले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा