मुंबईतील इंच इंच जागा फेरीवाल्यांनी व्यापली आहे. सगळीकडेच दाटीवाटी. मग मुंबईत भागत नाही, म्हणून नवी मुंबईच्या दिशेने पसरत चाललेल्या ‘आठवडा बाजारा’ने सध्या पोलीस आणि गावगुंडांचे खिसे दिवसेंदिवस फुगू लागल्याच्या चर्चेने अनेकांवर हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवण्याची वेळ आली आहे. याचे कारणही तसेच आहे. खारघर, कामोठे, कळंबोली, खांदेश्वर आणि नवीन पनवेलमधील अनेक मोकळे रस्ते, पदपथ याशिवाय मोकळे भूखंड शेकडोंच्या संख्येने घुसलेल्या फेरीवाल्यांनी वाटून घेतले आहेत. ते या जागेसाठी दिवसाकाठी ५० रुपये भाडे गुंडांना देतात. याविषयी पोलिसांकडे तक्रार केली तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकारी नाव घेत नाहीत. त्यामुळे दाद मागूनही निर्धास्त चालण्याचा अधिकार नवी मुंबईतही हिरावून घेतला जात आहे, तर तक्रार करूनही काय उपयोग, अशा कोंडीत रहिवाशी अडकले आहेत.

सामानाने भरलेले टेम्पो मुंबईहून येथे येतात. दुपारी तीन ते रात्री आठ वाजेपर्यंत फेरीवाले रस्ते आणि पदपथ भाडय़ाने घेतात. व्यवसाय करतात. अर्थात धंद्यातला ‘वाटा’ काढायला येथील काही गावगुंड कार्यरत आहेत आणि त्यांना काही पोलिसांचा आशीर्वाद आहे, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. एका फेरीवाल्यांकडून पन्नास रुपये भाडे घेण्याची नवीन पद्धत सिडको वसाहतींमध्ये रुजली आहे. गावगुंडांना आणि काही पोलिसांच्या आशीर्वादाने हा लाखो रुपयांचा व्यवसाय सामान्यांची वाट अडवून राजरोस सुरू आहे.

खारघर, कामोठे, कळंबोली, खांदेश्वर, नवीन पनवेल आणि तळोजा औद्योगिक क्षेत्रात काही ठिकाणी हा व्यवसाय सध्या ‘आठवडा बाजार’ नावाने सुरू आहे. सोमवार ते शनिवार असे हे ‘आठवडे बाजारा’चे दिवस वेगवेगळ्या वसाहतींमधील रस्त्यांना वाटून दिले आहेत. स्थानिक गुंडांना हाताशी धरून हा व्यवसाय पोलिसांच्या देखरेखीखाली सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे मुंबई पोलीस कायद्याच्या रहदारीस अडथळा या नियमाखाली फेरीवाल्यांवर पोलीस दंडात्मक कारवाई करतात. पण या ‘आठवडा बाजारा’ने कितीही रहदारी रोखली तरी पोलिसांना हे फेरीवाले दिसत नाहीत. नवी मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, अहमद जावेद, के. एल. प्रसाद यांनी फेरीवाले मुक्त वसाहती करा, असे फर्मान सोडले होते. त्यामुळे किमान सिडको वसाहतींमधील रस्त्यांवर गॅस आणि स्टोव्हवर चालणारे वडापाव विक्रेते घरी बनवून रस्त्यांवर विक्री सुरू झाली. एवढेच नव्हेतर रस्ता अडविणाऱ्या किती फेरीवाल्यांवर कारवाई केली याची माहिती नवी मुंबई पोलीस दलाचे तत्कालीन पोलीस आयुक्त मागवीत होते. परंतु सध्या पोलीस आयुक्तांनी फेरीवाल्यांविषयी कोणत्याही सूचना न दिल्याने सिडको वसाहतींमधील मुख्य रस्त्यांवरून चालण्यासाठी नागरिकांना वाट शोधावी लागत आहे.

याबाबत या फेरीवाल्याने तर ‘सर्वस्तरांवर आम्ही भाडे देतो, म्हणून आमच्यावर कोणीही कारवाई करू शकत नाही’ असे स्पष्ट केले. सिडकोने फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी अनियंत्रित बांधकाम विभागाला काम दिले आहे. मात्र या विभागाकडे सिडकोच्या मालकीच्या भूखंडावर कब्जा करणे, प्रकल्पग्रस्तांच्या बेकायदा बांधकामे तोडणे, अशी इतर कामांची जबाबदारी असल्याने हा विभाग या फेरीवाल्यांच्या वाढत्या रांगेला रोखण्यात असमर्थ ठरत आहे.

कारवाई कधी?

उच्च न्यायालयाचा निर्णयाचा दाखला देऊन नवी मुंबईचे पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांनी मागील वर्षी साजरा झालेले एक दिवसाचा दहीहंडी उत्सव, दहा दिवसांचे गणेशोत्सव आणि नऊ दिवसांचा नवरात्रोत्सव हे रस्त्यांवरून मैदानात साजरा करायला भाग पाडले. ज्या मंडळांनी पोलिसांच्या आदेशाला फाटा दिला त्यांच्यावर दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात आली. परंतु वर्षांतील ६० आठवडे रस्ता रोखून सामान्यांची वाट अडविणाऱ्यांवर कोणतीच कारवाई पोलिसांकडून होताना दिसत नाही, असा आरोप नागरिक करीत आहेत.

काही तासच पदपथ मोकळे

कळंबोली वसाहतीमधील समाज मंदिरामध्ये मंगळवारी सकाळी ११ वाजता मनस्वी स्त्री संसाधन केंद्राचे उद्घाटन सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांच्या हस्ते होणार असल्याने सिडकोच्या अधिकाऱ्यांनी जागरूकपणा दाखवत या परिसरातील पदपथावरील फेरीवाला हटाव मोहीम हाती घेतली. सव्वादहा वाजेपर्यंत समाज मंदिर व चर्चशेजारील फेरीवाले आणि टपऱ्या हटविण्यात सिडकोच्या अधिकाऱ्यांना यश आले. कळंबोलीत पदपथावरील टपऱ्या भाटिया यांच्या लक्षात येऊ नयेत याची खबरदारी सिडकोच्या अधिकाऱ्यांनी घेतली होती. मात्र उद्घाटन सोहळा संपताच टपरीधारक व फेरीवाल्यांनी पुन्हा आपल्या जागेचा ताबा घेतला.