नवी मुंबईच्या विविध विभागांत आठवडा बाजार भरत आहे. या आठवडा बाजारांमुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे आठवडा बाजार बंद करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
नवी मुंबईत आठवडा बाजरांची जुनी परंपरा आहे. प्रत्येक ठिकाणच्या बजाराचा दिवस ठरलेला आहे. सानपाडा येथे सोमवार, दिघा शुक्रवार व रविवार, घणसोल शुक्रवार, कोपरखरणे बुधवार, ऐरोली गुरुवार, शुक्रवार नेरुळ- शिरवणे गाव आणि तुभ्रे नाका येथे रविवार असे बाजाराचे दिवस ठरलेले आहेत. मागील अनेक वर्षांपासून आठवडय़ाचे बाजार नियमित भरतात; परंतु अलीकडच्या काळात हे आठवडा बाजार विविध कारणांमुळे त्रासांचे डोकेदुखी ठरू लागले आहे. शहरातील अंतर्गत भागात आठवडा बाजार भरत असल्याने वाहतूक व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सोसायटीच्या लगत असणारे पदपथ, शाळेचे मैदान, चौक अशा ठिकाणी आठवडा बाजार गर्दी करून बसलेला आहे. त्यामुळे मॉल संस्कृती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईत आठवडा बाजारांनी कोंडी केली आहे. ऐकीकडे वाहतूक समस्या निर्माण झालेली असताना बाजारातील गर्दीचा आधार घेऊन सोनसाखळी चोरी, पाकीट मारी असे प्रकार वाढीस लागले आहेत. विशेष म्हणजे या बाजारात येणारे जवळजवळ ८० टक्के विक्रेते हे शहराबाहरेचे असतात. स्थानिकांना रोजगार मिळावा असा आठवडा बाजारांचा उद्देश असताना विविध ठिकाणांहून आलेल्या व्यापाऱ्यांचे मात्र चांगलेच फावले आहे. अनेक ठिकाणी स्थानिक वसुलीदादांनी याचा फायदा घेत यांच्याकडून पैसे उकाळण्याचा धंदाही सुरू केला आहे. लोकप्रतिनिधींनी या विरोधात आवाज उठवला आहे; मात्र दोन वर्षांत पालिकेचे फेरीवाला धोरण अस्तित्वात न आल्याने आठवडा बाजारांचा उद्योग तेजीत सुरू आहे.

Story img Loader