शेतकरी व प्रकल्पग्रस्तांचे नेते दिवंगत माजी खासदार दि. बा. पाटील यांचे जन्मस्थळ असलेल्या उरण तालुक्यातील जासई गावाच्या वेशीवर दिबांच्या नावाची स्वागत कमान उभी करण्यात आली आहे. माजी आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते या कमानीचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. या कमानीमुळे भावी पिढीला तसेच उरणमध्ये येणाऱ्यांना दिबांच्या जन्मस्थळाची तसेच त्यांनी सर्वसामान्य कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर व प्रकल्पग्रस्तांसाठी केलेल्या लढय़ाचेही स्मरण राहील, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस, रायगडचे दोन वेळा खासदार तसेच सहा वेळा आमदार त्याचप्रमाणे राज्याचे विरोधी पक्ष नेतेपद भूषविणारे लढवय्ये नेते खासदार दि. बा.पाटील यांचे जासई हे मूळ गाव आहे.
उरणचा १९८४ चा प्रसिद्ध शेतकरी लढा, त्यातून निर्माण झालेला शेतकऱ्यांच्या साडेबारा टक्क्य़ांचा हक्क, आगरी समाज परिषदेच्या माध्यमातून केलेले सामाजिक व शैक्षणिक कार्य, जेएनपीटी साडेबारा टक्केची लढाईही आदी घटनांमधून दिबांचे नेतृत्व उजळून निघाले. या कार्याचे स्मरण राहावे व त्यातून तरुणांना प्रेरणा मिळावी यासाठी ही स्वागत करणारी कमान उभारण्यात आली आहे. या वेळी जासई ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच अनंत पाटील, पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे आदी उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा