नवी मुंबई पोलिसांची रेव्ह पाटर्य़ावर करडी नजर; अतिरिक्त बंदोबस्त
सरत्या वर्षांला निरोप देण्यासाठी व नवीन वर्षांच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरच्या रात्री शहरातील उत्साहावर पोलीस व वाहतूक पोलिसांची करडी नजर राहणार आहे. आनंद व्यक्त करा, पण शिस्तीने, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
दर वर्षी नववर्षांच्या स्वागतासाठी शहरभर हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये तरुणाईच्या उत्साहाला उधाण आल्याचे चित्र पाहायला मिळते. तर नवी मुंबईचा रत्नहार असलेल्या पाम बीच मार्गालगत रोषणाईने सजलेले मुख्यालय व त्या ठिकाणी सेल्फी घेण्यासाठी नागरिक मोठय़ा प्रमाणात गर्दी करतात. त्यामुळे पाम बीच मार्गासह संपूर्ण नवी मुंबई पोलीस मुख्यालय क्षेत्रात पोलिसांची करडी नजर राहणार आहे.
हॉटेल, रेस्टॉरन्ट व बारमध्ये विविध प्रकारची सूट दिली जाते. त्यामुळे फूड विथ ड्रिंक तसेच विविध ठिकाणी नववर्षांच्या पाटर्य़ाचे हॉटेलमध्ये आयोजन केले जाते. शहराबाहेर जाणाऱ्यांची संख्याही मोठय़ा प्रमाणावर असते. त्यामुळे शीव-पनवेल महामार्ग, पाम बीच मार्ग, ठाणे-बेलापूर मार्ग यासह शहराअंतर्गत रस्त्यावरही वाहतुकीचा खोळंबा होऊ नये म्हणून पोलिसांनी नियोजन केले आहे. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. पोलीस मुख्यालयाद्वारे अतिरिक्त पोलीस मनुष्यबळही देण्यात येणार आहे.
तर तीन महिन्यांसाठी परवाना रद्द
पाम बीच मार्गासह शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर ‘ड्रिंक अॅन्ड ड्राइव्ह’साठी चेक पोस्ट करण्यात येणार आहेत. जर दारू पिऊ न गाडी चालवताना सापडलात तर ३ महिन्यांसाठी त्याचा वाहतूक परवाना रद्द करण्यात येणार आहे. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून नियोजन केल्याचे वाहतूक उपायुक्त सुनील लोखंडे यांनी सांगितले.
माहिती तंत्रज्ञान कक्षही अलर्ट
साध्या वेशातील पोलिसांच्या पथकाची नजर राहणार आहे. रेव्ह पाटर्य़ाचे आयोजन कोठे केले जात आहे का? यासाठी माहिती तंत्रज्ञान कक्षही अलर्ट करण्यात आला आहे. अतिरिक्त पोलीस व्यवस्था करण्यात येणार असून अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे.
शहरात हॉटेल व बारमध्ये विविध पाटर्य़ावर तसेच रेव्ह पाटर्य़ावरही पोलिसांची नजर राहणार आहे. दारू पिऊ न अनुचित घटना होऊ नये व पोलीस कारवाईला सामोरे जावे लागू नये म्हणून पोलिसांना सहकार्य करावे.
– डॉ. सुधाकर पाठारे, उपायुक्त परिमंडळ १