वास्तू वापरासाठी त्वरित खुली करणे शक्य असेल, तरच तिचे उद्घाटन करण्यात यावे, असा पायंडा नवी मुंबईच्या महापौरांनी पाडला असताना सानपाडा सेक्टर १० येथे सव्वासहा कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेले समाज मंदिर १० महिन्यांपासून वापराविना आहे. इमारतीत विजेची आणि उद्वाहकाची व्यवस्थाच नसल्याने ही इमारत धूळ खात पडून आहे.

सानपाडा सेक्टर १० येथील भूखंड क्रमांक १८७ येथे महापालिकेने समाजमंदिर उभारले आहे.  त्यात दोन सभागृहे आहेत. इमारतीचे काम २०१५मध्ये सुरू झाले. या कामासाठी ३० जून २०१७ पर्यंत मुदत देण्यात आली होती. या वास्तूचे काम १० महिन्यांपूर्वीच पूर्ण झाले आहे. परंतु इमारतीच्या मूळ कामात  प्रकाश व्यवस्था तसेच उद्वाहनाची निविदाच काढण्यात आलेली नाही.  विद्युत विभाग व शहर अभियंता विभागातील अधिकाऱ्यांतील  समन्वयाच्या अभावामुळे हे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. सध्या या वास्तूच्या विद्युत व्यवस्थेसाठी १८ लाखांची निविदा मंजूर करण्यात आली आहे, मात्र अद्याप काम सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे लवकर या दोन्ही कामांना सुरुवात करून वास्तू वापरात आणण्याची मागणी होत आहे.

माझ्या महापौरपदाच्या कारकीर्दीतच सानपाडा सेक्टर १० येथील  समाजमंदिराचे काम पूर्ण व्हावे यासाठी प्रयत्न केला होता. सहशहर अभियंता व शहर अभियंता यांच्यातील समन्वयाअभावी हे काम अर्धवट आहे. लवकरात लवकर काम पूर्ण करण्यात यावे.
– सुधाकर सोनावणे, माजी महापौर

माझ्या प्रभागात असणारी ही समाज मंदिराची वास्तू बांधून तयार आहे.पण वीज व उद्वाहनाची सोय नसल्यामुळे इमारत पूर्ण असूनही वापराविना पडून आहे. त्यामुळे तात्काळ या ठिकाणचे काम पूर्ण करावे, अशी मागणी आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.
– ऋचा पाटील, स्थानिक नगरसेविका

Story img Loader